भात, नाचणीसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करावेत
ठाणे दि.१९ – ठाणे जिल्ह्यात भात व नाचणी करीता खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री विमा योजना लागू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
भातासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता २ टक्के व नाचणीसाठी तो २ टक्के आहे. भातासाठी प्रति हेक्टरी ४२ हजार १०० विमा संरक्षित रक्कम असून विमा हप्ता ८४२ रुपये आहे तर नाचणीसाठी प्रति हेक्टरी २० हजार रुपये संरक्षित रक्कम असून विमा हप्ता ४०० रुपये आहे.
या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येते. अर्ज व विमा हप्ता कॉमन सर्वीस सेंटर मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे. याकरीता बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक यामध्ये विम्याचे अर्ज सादर करावयाचे आहेत. बिगर कर्जदार शेतकर्याना २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाची मुदत आहे तर इतर शेतकऱ्यांसाठी ती ३१ जुलै पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एम डी सावंत यांनी केले आहे.