भर रस्त्यात डोंबिवली स्टेशनपरिसरात फेरीवाल्याने काढली तलवार
(श्रीराम कांदु)
डोंबिवली- स्टेशनपरिसरात फेरीवाल्यांना हटविण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याने आता येथील जागा फेरीवाल्यांनी स्वतःची असल्याचे सिद्ध केले आहे. जागेवरील भांडणावरून फेरीवाल्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी एका गटाने भररस्त्यात तलवार काढल्याने नागरिकांची पळापळ झाली होती. हि घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र या घटनेनंतर पालिका प्रशासन फेरीवाल्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न डोंबिवलीकरांकडून विचारला जात आहे.
स्टेशन परिसरात `भाई“दादा` असलेले गुंडप्रवृत्तीचे काही फेरीवाले कोणालाही न जुमानता बिनधास्तपणे बसलेले असतात. अश्या फेरीवाल्यांनी पदपथाचाही ताबा घेतल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. सोमवारी दुपारी इंदिरा चौकात फेरीवाल्यांच्या दोन गटात जागेवरून हाणामारी झाली. संध्याकाळी पुन्हा या गटात मारामारी सुरु असताना यातील एका गटाने भररस्त्यात तलवार काढली होती. हे पाहून नागरिक घाबरून पळायला लागले. हाकेच्या अंतरावर पालीकेचे विभागीय कार्यालय आणि पोलीस ठाणे असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.