‘बे एके बे’चा संगीत प्रकाशन सोहळासंपन्न…
कथा आणि त्या कथेला पुढे नेणा-या अर्थपूर्ण गीतरचना हा सिनेमाचा आत्मा असतो असं नेहमी म्हटलं जातं. याच कारणामुळे गीत-संगीताची बाजू मराठी सिनेमात फार महत्त्वाची मानली जाते. हीच बाब लक्षात घेऊन ‘बे एके बे’ या सिनेमाला सुमधुर संगीताचा साज चढवण्यात आला आहे. ‘बे एके बे’ या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. या सोहळयाला सिनेमाचे निर्माते विकास भगेरीया, पूर्णिमा वाव्हळ-यादव, हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा, अनिता महेश्वरी, सहनिर्माते प्रविण गरजे, चिंतामणी पंडित, केदार दिघे, मयूर नाईक, झी म्युझिकचे आदित्य निकम, दिग्दर्शक संचित यादव, संगीतकार विलास गुरव, गायक ऋषिकेश रानडे, सागर सावरकर, राहुल सुहास, जितेंद्र
सिंग, कलाकार संजय खापरे, संतोष आंब्रे आणि तंत्रज्ञांच्या जोडीला मराठी सिनेसृष्टीतील काही मान्यवर मंडळीही उपस्थित होती.
आजच्या कालातील शिक्षण व्यवस्था आणि समाजाची मानसिकता यावर भाष्य करणाऱ्या बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बॅनरखाली केली आहे. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते असून प्रविण गरजे आणि चिंतामणी पंडित हे सहनिर्माते
आहेत. दिग्दर्शक संचित यादव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून कथा आणि पटकथालेखनही यादव यांनीच केलं आहे. या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत. यापैकी “यं वयदिका मंत्र…’’ या प्रार्थनेसोबतच ऋषिकेश रानडेने ‘‘जनसेवा ही ईश्वर भक्ती…’’ हे गाणंही गायलं आहे. ‘‘काव काव – चिव
चिव…’’ या काहीशा इरसाल गाण्यासोबतच ‘‘हुतुतूचा खेळ…’’ हे गाणं गात सागर सावरकरने या गीतात हुतूतू या खेळाचा थरार आणण्याचा प्रयत्न केला आहे. ही तीनही गीतं संचित यादव यांनीच लिहिली आहेत. अभिजीत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पोवाडयाला राहुल सुहास यांचा स्वर लाभला आहे. याखेरीज अभिजीत यांनी या सिनेमाचं टायटल साँगही लिहिलं आहे. हे गाणं जितेंद्र सिंग यांच्या आवाजात रसिकांना ऐकायला मिळेल. या पाचही गीतांना संगीतकार विलास गुरव यांनी संगीत दिलं आहे.
बे एके बे’ची कथा पृथ्वीच्या पाठीवर कुठेही घडणारी अशी आहे. ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या एका शिक्षकाभोवती या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. आपण स्वीकारलेलं कार्य इमाने इतबारे करत ज्ञानदानाचा अखंड यज्ञ सर्वसामान्यांसाठी खुला करणाऱ्या या शिक्षकाला कोणत्या प्रकारच्या दिव्यातून जावं लागतं, त्याची कथा या सिनेमात पाहायला मिळेल. सिनेमाची कथा वास्तवदर्शा असल्याने त्याला सुमधूर गीत-संगीताची जोड देत ‘बे एके बे’मध्ये जीवनाचे रंग उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिग्दर्शक संचित यादव म्हणतात. या सिनेमातील सर्वच गीतरचना कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारी असून, प्रसंग अधिक विस्तृतपणे खुलवणाऱ्या असल्याचं संगीतकार विलास गुरव यांचं म्हणणं आहे.
या सिनेमात जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असून साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदि
बालकलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिजीत कुलकर्णी यांनी ‘बे एके बे’चं संवादलेखन केलं आहे. कला दिग्दर्शन देवेंद्र तावडे यांनी, तर नृत्य दिग्दर्शन संतोश आंब्रे यांनी केलं आहे. कॅमेरामन अतुल जगदाळे यांनी या सिनेमाचं छायालेखन केलं असून संकलनाची बाजू कमल सैगल आणि विनोद
चौरसिया यांनी सांभाळली आहे. व्हिएफक्सची बाजू शेखर माघाडे यांनी सांभाळली असून अतुल मर्चंडे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.