बेरोजगार पदवीधर, शिक्षकांबरोबरच पर्यटनातून रोजगाराला प्राधान्य – अॅड. निरंजन डावखरे यांचा संकल्प जाहीर

ठाणे, दि. 18 (प्रतिनिधी) : बेरोजगार पदवीधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, मिशन एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सुविधा पुरविण्याचा संकल्प अॅड. निरंजन डावखरे यांनी जाहीर केला आहे. स्थानिकांना नोकरीसाठी 70 टक्के आरक्षणाचाही आग्रह धरणार असल्याचे निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे.कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप-रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांच्या `माझा संकल्प’चे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, अॅड. निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन सुविधेतून बेरोजगारांना संधी

कोकणात पर्यटन सुविधा उपलब्ध करुन बेरोजगारांना व्यवसाय उपलब्ध करुन दिले जातील. कोकणात किनारा पर्यटनाचे धोरण तयार करुन राबविले जाईल. पालघर जिल्ह्यात सागरी किनारा रस्ता उभारला जाईल. त्यातून पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. बेरोजगार तरुणांना फळप्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी साह्य, कोकणातील उद्योगात स्थानिक तरुणांना नोकरीसाठी पाठपुरावा करण्याबरोबरच तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बेरोजगारांच्या प्रशिक्षणासाठी खास निधी ठेवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

शिक्षक-शिक्षकेतरांना प्राधान्य

शिक्षक-शिक्षकेतरांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शिक्षकांसह कुटुंबियांना आकर्षक विमा योजना, वरिष्ठ निवडश्रेणी, शिक्षकांचे सरकारकडे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. कृषीविषयक शिक्षकांना बिनव्याजी कर्ज, भरतीवरील बंदी उठविण्याबाबत प्रयत्न आदी संकल्प करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद व नगरपरिषदांमधील शिक्षिकांच्या मुलांसाठी पाळणाघरे, चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासही प्राधान्य दिले जाणार आहे.

समृद्ध शाळा व आरटीईवर लक्ष्य

कोकणातील सर्व शाळा समृद्ध करण्याबरोबरच मोठ्या शहरांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी करण्यावर लक्ष्य केंद्रीत केले जाईल. कोकणातील प्रत्येक शाळेत डिजिटल क्लासरुम करण्याबरोबरच गणित प्रयोगशाळा, स्वच्छ प्रसाधनगृह व पिण्याचे पाणी, सौर उर्जा आदींना प्राधान्य दिले जाईल.

मुली-महिलांसाठी वसतीगृहे

कोकणातून मुंबईत नोकरी वा शिक्षणासाठी येणाऱ्या महिला व मुलींसाठी वसतीगृह, कृषी महाविद्यालयात महिलांना मोफत प्रशिक्षण, प्रत्येक शाळेत सॅनिटरी पॅड व्हेंडीग मशीन बसविण्याला प्राधान्य दिले जाईल. लघुउद्योजिका घडविण्यासाठी प्रशिक्षण व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

कृषी क्षेत्रातील तरुणांना प्रशिक्षण
दापोली कृषी विद्यापीठाची ठाणे जिल्ह्यात शाखा व पालघरमध्ये कृषी महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, बेरोजगार तरुणांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत.

वेगवान प्रवासासाठी जाळे

कोकणातील वेगवान प्रवासासाठी अंतर्गत रस्त्यांचे जाळे उभारण्याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर मुंबईतून कोकणातील प्रमुख बंदरात जलवाहतूकीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email