बेकायदेशीर लॉटरी, जुगार केंद्र चालविणारे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध “एमपीडीए”

नागपूर दि.२५ – महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर लॉटरी, जुगार केंद्र चालविणारे, वेश्या व्यवसाय करणारे तसेच मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्तींविरोधात ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात विघातक कृत्यांना प्रतिबंधघालण्याबाबत अधिनियम, १९८१ मध्ये सुधारणा विधेयक विधान परिषदेने शुक्रवारी मंजूर केले.

गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सभागृहासमोर गुरुवारी रात्री हे सुधारणा विधेयक मांडले. महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमात झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडीओ पायरसी, वाळू तस्करी, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार यांचा समावेश आहे. या विधेयकात सुधारणा करण्यासाठी शासनाने हे विधेयक मांडले. महाराष्ट्र राज्याला कायदेशीर लॉटरीपासून मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. मात्र बेकायदेशीर लॉटरी केंद्र व जुगार केंद्रांमुळे राज्याच्या महसुलात तूट येत आहे. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेलादेखील बाधा पोहोचत आहे. सोबतच वेश्या व्यवसाय करणे, सक्तीने विवाह करणे, वेठबिगार, अवयव प्रत्यारोपण, भीक मागणे यासाठी मानवी अपव्यापार तसेच तस्करी करण्याच्या कामात गुंतलेल्या समाजविघातक व्यक्तींमुळे समाजाला धोका उत्पन्न होत आहे. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्व व्यवसायातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे आशा व्यक्तींविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळेच यांना विघातक कृत्यांना आळा घळण्याबाबतच्या अधिनियमाच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका डॉ.पाटील यांनी मांडली. 

या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी, महसुलाची हानी टाळण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था राहावी यासाठी अधिनियमातील तरतुदींचा उपयोग होईल. यासाठीच ही सुधारणा करण्यात येत आहे, असेदेखील ते म्हणाले. या विधेयकावर किरण पावसकर, हरिभाऊ राठोड, राहुल नार्वेकर यांनी उपसूचना सुचविल्या. हातभट्टीवाल्यांना या अधिनियमातून दूर ठेवावे अशी मागणी राठोड यांनी केली.

• यांच्यावर होणार ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

• बेकायदेशीर जुगार अड्डे चालवणारे

• बेकायदेशीर लॉटरी तिकिटांची विक्री करणारे

• बेकायदेशीर लॉटरीसंबंधात काम करणारे

• वेश्या व्यवसाय करणारे किंवा करवून घेणारे

• सक्तीने विवाह लावणारे

• वेठबिगारी करवून घेणारे

• भीक मागण्यासाठी मानवी तस्करी करणारे

Hits: 24

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email