बीड बसस्थानकातून महिलेचे दागिने लंपास
बीड – माहेरी जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोन अनोळखी महिलांनी लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी बीड बस स्थानकात घडली. सविता दत्तात्रय रोकडे (रा. भुम, जि. उस्मानाबाद) यांचे धारूर तालुक्यातील कारी हे माहेर आहे.
शनिवारी त्या माहेरला जाण्यासाठी भूम येथून बीड बस स्थानकात आल्या. त्यानंतर दुपारी २.३० वाजता कारी येथे जाण्यासाठी त्या पाटोदा-परळी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मिनी गंठन लंपास केले.
बसमध्ये चढताना या महिलासतत रोकडे यांना ढकलाढकली करत होत्या, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. तेलगाव बस स्थानकात उतरल्यानंतर त्यांना मिनी गंठन चोरीला गेल्याचे लक्षात आले.
त्यांनतर माहेरी पोहोचून त्यांनी भावाला सोबत घेत बीडला माघारी येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. सविता रोकडे यांच्या तक्रारीवरून अनोळखी दोन महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.