बारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा शिक्षकांच्या संघटनेचा इशारा
ठाणे –आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांच्या संघटनेने दिला आहे. ऐन परीक्षेच्या वेळी संप झाला तर काय होईल, अशी काळजी विद्यार्थ्यांना सतावत आहे.सरकारकडून शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य होत नसल्याने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आंदोलनांना सुरवात केली आहे. १९ डिसेंबर, १७ व १८ जानेवारी रोजी या संघटनेतर्फे आंदोलने करण्यात आली. परंतु सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारी शिक्षकांतर्फे मुंबईत जेलभरो आंदोलन व संप पुकारण्यात आला होता. १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरी स्वीकारलेल्या शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी , सन २०१२ पासूनच्या शिक्षकांना तातडीने नियुक्ती व मान्यता देण्यात यावी, कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे, २४ वर्ष सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवडश्रेणी द्यावी, माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करावा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, अशा मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी शुक्रवारी संप पुकारला होता,. जेलभरो आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. ऐन परीक्षेच्या वेळी संप झाला तर काय होईल, अशी काळजी विद्यार्थ्यांना सतावत आहे.