फेरीवाला प्रश्नावरून भाजप शिवसेनेत `आरोपांची फटाकेबाजी` शिवसेनेला परवानगी तर फेरीवाल्यांना वेगळा न्याय का
डोंबिवली दि.०१ – नियमाप्रमाणे स्टेशनबाहेरील १५० मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. मात्र १५० मीटर बाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर ही कारवाई केली जाते. मात्र आता फेरीवाला प्रश्न तापला असून यात शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळी सण जवळ आल्याने फेरीवाल्यांनी पालिका प्रशासनाकडे बसण्यास जागा द्या अशी मागणी केली आहे. दुसरीकडे दिवाळी सणात शिवसेनेच्या स्टॉलला परवानगी देता मग फेरीवाल्यांना वेगळा न्याय का ? असा प्रश्न भाजपने रामनगर पोलिसांना विचारला. यावेळी भाजपच्या कामगार आघाडीने पोलीस ठाण्यात काढलेल्या मोर्च्यात अनेक फेरीवाले सहभागी झाले होते.
हेही वाचा – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी अर्पण केली आदरांजली
डोंबिवलीत फेरीवाला प्रश्न सोडविण्यास पालिका प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेवर नाराज झालेल्या फेरीवाल्यांच्या संघटनेने अनेक वेळेला पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी चर्चा केली. पालिकेवर मोर्चा काढूनही आपले म्हणणे प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न केले. मात्र यावर पालिकेने ठोस पाउले उचलली नसल्याने एन दिवाळीत फेरीवाल्याचे दिवाळे निघाले आहे. सोमवारी भाजप कामगार आघाडीचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, अॅड.सुरेश कोलते, चैतन्य कदम, प्रशांत तळवडकर, प्रशांत पवार, सचिन रावराणे, अमिताभ सिंग, मयुरेश्वर वाडेकर आदीसह अनेक फेरीवाल्यांनी रामनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. वपोनी विजयसिंग पवार यांना उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी निवेदन दिले. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद जाधव म्हणाले, फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करणारी पालिका शिवसेनेला मात्र स्टाॅॅल लावल्यास का कारवाई करत नाही. दिवाळी सणात या गरीब फेरीवाल्यांना १५० मीटर बाहेर तरी बसण्यास पालिकेने हरकत घेता कामा नये. दरम्यान शिवसेना आणि भाजप मित्र असल्याने सत्तेत विराजमान झाले आहेत. मात्र फेरीवाला प्रश्नात हे दोन्ही प्रश्न एकमेकावर आरोपांची फटकेबाजी करत असल्याचे दिसते.