फेक न्यूज परिणाम व दक्षता कार्यशाळेतील सूर विवेक बुद्धी जागृत ठेवा, माहितीची सत्यता पडताळा
(श्रीराम कांदु)
ठाणे दि.०१ -पूर्वी माहितीचे स्त्रोत मर्यादित होते. अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवला जायचा मात्र आता समाज माध्यमांमुळे बातमी किंवा माहितीतला खरे खोटेपणा तपासणे अवघड होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत सारासार विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे तसेच माहिती अधिकृत स्त्रोतांकडून आली आहे का हे तपासले पाहिजे असा सूर आज एका कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे “फेक न्यूज परिणाम आणि दक्षता” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ पत्रकार आणि पीटीआय चे प्रतिनिधी एस रामकृष्णन तसेच पत्रकार निलेश पानमंद यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी श्रीमती नारकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
एस रामकृष्णन यांनी यावेळी पूर्वीच्या काळातील काही उदाहरणे दिली. १९८४ च्या दरम्यान ठाणे भागात उसळलेल्या दंगलीमुळे सर्वत्र संचारबंदी लावली आहे का अशी विचारणा त्यांना दिल्लीहून त्यांच्या मुख्यालयातून होत होती, मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत: त्यांच्यासमवेत असल्याने वस्तुस्थितीदर्शक माहिती त्यांना देता आली व खोट्या बातमीचा प्रसार टळला. काही वर्षांपूर्वी तळोजा भागात एक इमारत कोसळून शंभरावर बळी गेले अशी अफवा पसरली होती, त्यावेळी समाज माध्यमे नव्हती. पण स्वत; प्रत्यक्ष खातरजमा करून व अधिकृत व्यक्तीशी बोलून आपण कशी योग्य ती सत्य बातमी दिली याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार म्हणून काम करतांना समाज विघातक विचार लोकांपर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
बातमीची खातरजमा महत्वाची
पत्रकार निलेश पानमंद यांनी पत्रकारास माहिती मिळविताना किती सावध राहावे लागते याची उदाहरणे दिली. विश्वासार्हता हा पत्रकारितेचा पाया आहे हे सांगताना त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कसे वार्तांकन करावे लागले ते सोदाहरण स्पष्ट केले. मोठ्या दैनिकांमध्ये कुठल्याही महत्वाच्या बातमीची खातरजमा केल्याशिवाय ती प्रसिध्द केली जात नाही हे सांगून निलेश पानमंद म्हणाले की, आम्ही विविध माध्यमातून व स्त्रोतांकडून ती बातमी सत्य आहे किंवा नाही ते तपासतो तसेच दोन्हीही बाजू मांडतो .
स्मार्ट फोन हे एक शस्त्रच
श्रीमती नारकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर कक्ष कसे काम करतो त्याची माहिती दिली तसेच भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याची उकल करणे कसे सोपे जाणार आहे ते सांगितले. नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी दत्तात्रय पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, युवकांनी समाज माध्यमे जबाबदारीने हाताळली पाहिजेत. मोबाईल हे एक शस्त्रासारखे असून त्याचा विधायक वापर केला पाहिजे, यासाठी कुठलीही बातमी फोरवर्ड करतांना ती विविध स्त्रोतांतुन खरी आहे किंवा खोटी ते तपासले पाहिजे. इतिहास संशोधन सदाशिव टेटविलकर यांनी सांगितले की ऐतिहासिक संशोधनात नेहमीच समोर आढळणाऱ्या साहित्य किंवा वस्तूच्या उत्पत्तीचा अभ्यास केला जातो, निष्कर्ष तपासले जातात आणि मगच त्याविषयी अधिकारवाणीने बोलण्यात येते. उचलली जीभ ,लावली टाळ्याला असा प्रकार होत नाही. परंतु आता अनेकदा समाज माध्यमांवरही इतिहासाचा विपर्यस्त करणाऱ्या गोष्टी व चित्रे पहावयास मिळतात हे खेदजनक आहे.
जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी प्रास्ताविकात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय समाज माध्यमांचा जबाबदारीने कसा उपयोग करावा यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत सांगितले. महामित्र उपक्रमातून समाज माध्यमांबाबत सकारात्मक जागृती निर्माण करण्यात कसे यश मिळत आहे याची त्यांनी थोडक्यात माहिती दिली.
उपस्थित शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला व शंका निरसन करून घेतले.