फसविल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळाल्याची राज्यातील पहिली घटना

   ( श्रीराम कांदु )

 ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटीची रक्कम काल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथील एका छोटेखानी कार्यक्रमात काल जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते वाटप करण्यात आली. महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळ्यातील अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम१९९९ चे कलम ६ अन्वये विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे . ठाणे जिल्ह्यातील एमपीआयडी अंतर्गत दाखल झालेले दावे जिल्हा न्यायाधीश-६ तथा विशेष एम. पी. आय.डी न्यायाधीश प्र.पु.जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात घेता गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली . याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे यांनी चौकशी व पडताळणी केली होती.

 काल झालेल्या कार्यक्रमात एकूण १ कोटी २५ लाख ९४ हजार ८४८ रुपये गुंतवणूकदारांना धनादेशाद्वारे दिले. याप्रसंगी बोलतांना उपविभागीय दंडाधिकारी सुदाम परदेशी म्हणाले की, जनतेच्या काबाडकष्ट करून जमविलेल्या पुंजीची रक्कम मिळण्यासाठी जो लढा गुंतवणुकदारांनी दिला त्याला आज यश आले. जे मयत असतील अशा गुंतवणुकदारांच्या वारसांना वारसाचा दाखला सादर करून रक्कम घेता येईल.

गुंतवणुकदार प्रतिनिधी  रणजीत चित्रे , डी.एम.नाडकर्णी ,प्रभाकर टावरे यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ झाल्याचे सांगितले तसेच कायदा आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास विधी सेवा समिती सचिव पी.एम. मोरे, शासनाचे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email