फळे; भाजीपाला व दूधांतील विष…? विधान सभेत व्यक्त झाली चिंता…!

महाराष्ट्राच्या राजकारणातील तिन ज्येष्ठ नेत्यांचे निधन ही  महाराष्ट्रातील जनतेसाठी चटका लावून जाणारी बाब आहे. माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमूख, माजी गृहमंत्री आर.आर.पाटील आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक ज्येष्ठ आमदार व माजीमंत्री पतंगराव कदम यांच्या अकाली निघनाने विधानसभेत चिंता व्यक्त करण्यात आली.

राज्यातील शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या कुशल कर्तृत्वाने भारती विद्यापीठाची स्थापना करून विविध विषयांच्या जवळपास 200 शाखा निर्माण करणारे शिक्षणतज्ञ डॉ.पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या या निधनाने महाराष्ट्रातील विधानसभेत शोक प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत विविध राजकीय पक्ष प्रमुखांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्याच. परंतू पतंगराव कदम यांच्या कर्करोगाने झालेल्या निधनावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी जी चिंता व्यक्त केली ती देशातील आणि राज्यातील जनतेसाठी अतिशय चिंताजनक आणि वेळीच जागरूक होण्याची आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात संकरीत बियाणांचा वापर करून कृषी उत्पादनात वाढ करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. तोपर्यंत राज्यात मोठी ज्वारी, गावराणी बाजरी, वायवन कपाशी, पावसाळी मुग, भुईमुग, चवळी ही पारंपारीक पीके घेण्यात येत होती. या पिकांना कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत, फवारणी ही लागत नसे. किंवा तशी गरज शेतकर्‍यांना वाटली नाही. परंतू 90 ते 120 दिवसांत पिक घेण्याचा कृषी विद्यापीठांच्या प्रयोगाने शेतकरीही त्या दिशेने आकर्षित झालेत. पावसाळी पिकां नंतर रब्बी पिके आणि त्यानंतर उन्हाळी पिके घेण्याचा सपाटा शेतकर्‍यांनी लावला. वर्षातून एक पिक घेणारा शेतकरी आता पाण्याच्या आणि विजेच्या सोयीमुळे वर्षातून तिन-तिन पिके घेवू लागला. हायब्रिड ज्वारी, बाजरी, मुग असा हा प्रवास सुरू झाला. पाण्याची मुबलकता गेल्या चार दशकात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. धरणे, तलाव, विहीरी कायान्वित झालीत. शेतीला विज पूरवठयाचे प्रमाण देखील वाढले. पारंपारिक पध्दतीने शेती करणारा शेतकरी आता या संकरीत बियाण्याचा वापर करू लागला. परंतू वर्षातून तिन पिके घेत असतांना शेतीला रासायनिक खतांचा वापर सुध्दा वाढू लागला. शेतीत शेणखत वापरणारा शेतकरी आता रासायनिक खतांच्या वापराकडे सत्तरच्या दशकापासून वळू लागला आणि नंतरच्या कालखंडात हे प्रमाण हळू-हळू वाढू लागले. शेतकर्‍यांच्या हाती दोन पैसे खेळू लागले. परंतू आधूनिक शेतीच्या नावाखाली गेल्या तिन दशकात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अमुलाग्र बदल होतांना दिसत आहेत. ठिबक सिंचन, टिश्यु कल्चर, रासायनिक खते, पेस्टीसाईड आणि तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेली आणि एकरी भरघोस उत्पादने देणारी आधूनिक बि-बियाणे बाजारात मिळू लागली. ज्वारी, बाजरी, बीटी कपाशी, मूग, भुईमूग, तूर, चवळी, ऊस, केळी आणि या सोबतच मुळा, गाजर, शेवगा, टोमॅटो, पपई, द्राक्ष,वांगी, भेंडी, गड्डागोबी, फुलगोबी, हिरवी मिरची यांचे भरगोस उत्पादन देणारी संकरीत बियाणे, टिश्यु कल्चर रोपे, बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळू लागली. जी गावराणी बियाणी होती ती पूर्णपणे नष्ट झाली आहेत. म्हणजे आज जर कोणी जूनी ज्वारी आहे का तर ती कुठेही सापडणार नाही. तिच परिस्थिती बाजरी या पिकाची आहे. उडीद, मुग, चवळीची सुध्दा गावराणी बियाणे, आज सापडणार नाहीत. वायवन हे कपाशीचे पारंपारिक बियाणे शेतकर्‍यांना नकोसे झालेले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा देशातील आणि विदेशातील पेस्टीसाईडस् विकणार्‍या दुकानदारांना आणि कंपन्यांना होतो आहे, त्यासाठी दुकानदारांना मोठया प्रमाणावर कमिशन देण्यात येवू लागले आहेत. विदेश वारीचे आमिष देण्यात येत आहे. तब्बल तीस वर्षांपासूनच्या या खेळात गावराणी बियाणी तर नष्ट झालीच. परंतू शेतीची उत्पादकता नष्ट झाली. मातीतील नैसर्गिक घटक नष्ट झालेत. त्यामुळे आता देशातील शेतकरी पूर्णपणाने कंपन्यांच्या बियाणांवर, रासायनिक खतांवर आणि फवारण्यांवर अवलंबून आहे. त्याच्या हातात आता काहीही राहिलेले नाही. कमीत कमी दिवसात फळे, भाजीपाला आणि कृषी उत्पादने येवू लागली आहेत म्हणजे ज्या काळात शेतकरी पारंपारिक पध्दतीने पाण्याची व्यवस्था असल्यास वर्षातून दोनच पिके घेत होता. तेव्हा शेतकरी सुखी होता. आत्महत्या हा विषयच नव्हता. परंतू आधूनिक शेतीच्या आणि उत्पादन तंत्राचा जसजसा वापर वाढतो आहे, शेतीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढलेले आहे. परंतू तरी सुध्दा शेतकरी आत्महत्या करतो आहे. आणि दुसरी महत्वाची आणि प्रत्येक व्यक्तिसाठी आवश्यक बाब म्हणजे आम्ही रोज विष खातो आहोत. आणि नेमके यावरच जयंत पाटील यांनी बोट ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री विलासरावाचा मृत्यू, आर.आर.पाटील यांचा मृत्यू आणि आता पतंगराव कदमांचा मृत्यू कर्करोगाने झाल्याने आम्ही रोज काय खातो आहोत त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आणि ही गोष्ट सत्य आहे. डॉक्टर आता वेलवर्गीय किंवा जमिनीतील फळे भाज्या खाव्यात असा सल्ला देत आहेत. कारण त्यावर फवारणीचा प्रभाव कमी असतो किंवा प्रमाण कमी असते. राज्यात आज अशी परिस्थिती आहे की, आम्ही कोणताही भाजीपाला खावू शकणार नाहीत. केळी, खरबूज, गाजर, याची परिस्थिती अतिशय भयानक व विदारक आहे, एका रात्रीतून किंवा काही तासात आम्ही त्याची वाढ करतो आहोत, पिकवतो आहोत, त्यामुळे अलिकडच्या काळात राज्यात कर्करोग झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतांना आकडेवारी सांगते आहे आणि त्यामुळे फळे भाज्यांवरील औषध फवारणीवर आता निर्बंध आणले गेले पाहिजेत अशी सुचना या निमित्ताने जयंत पाटील यांनी विधानसभेत मांडली आहे. ज्याप्रकारे औषध क्षेत्रात बोगस कंपन्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचेवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. किटकनाशक फवारणीमुळे मागील काळात राज्यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला तर जवळपास एक हजाराचेवर शेतकर्‍यांना विषबाधा झाली होती. परंतू सरकारने कृषी सेवा केंद्रावर कठोर कारवाई केली नाही. कृषी अधिकारी पाकीटे घेवून शांत बसतात. परंतू शेतकर्‍यांनाही आता भाजीपाला पिकवितांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही फुलगोबी, गड्डागोबी, भेंडी, वांगी, द्राक्ष यावर अवाजवी प्रमाणात घातक अशी किटक फवारणी करतो आहोत. हिरवीगार, पिवळी, लालभडक, पांढरास्वच्छ असा भाजीपाला ग्रामीण भागापासून तर मुंबई-पुणे, बैंगलोरच्या भाजीमार्केट पर्यंत मिळू लागला आहे. वाहतूक सेवा जलद झाल्याने शहरे ग्रामीण भागातील भाजीपाल्यावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतू हा भाजीपाला आता आमच्या जीवावर उठला आहे. त्यासाठी घातक फवारणी भाजीपाल्यावर मारण्याचे निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी कडक कायदा करण्याची सुध्दा गरज आहे. या देशात आणि राज्यात रासायनिक युरीया, साबणाच्या पावडरपासून रोज हजारो लाखो लिटर दूध बनविले जाते आहे. त्यातून पेढे, कलाकंद, बरफी सारखे मिठाईचे पदार्थ बनविले जातात. सणासुदिच्या काळातच यावर भेसळयुक्त दूध, आणि मिठाई पकडली जाते. नंतर बारा महिने राजरोसपणे विषजन्य दूध बाजारात विकले जाते आहे. गाई-म्हशीचे गोठे कोठेच दिसत नाही. मात्र मोठ मोठ्या डेअरींची संख्या मात्र वाढतांना दिसते आहे. त्यांना कुणीच विचारत नाही की तुमचा गोठा कुठे आहे? अजूनही हे प्रकार लोकांच्या लक्षात येत नाही. गावकुसाबाहेर वाहणार्‍या अतिशय घाणेरड्या पाण्यात काही लोक भाजीपाल्याची पिके घेतात. किंवा त्या पाण्यात ग्रामीण भागातून आलेला भाजीपाला धुतात आणि मग तो बाजारात आणतात. त्यामुळे आपण रोज काय खातो आहोत भाजीपाला की विष? काय पित आहोत दुध की विष? यावर प्रत्येक व्यक्तिने चिंतन करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळून शेती करण्याची गरज आहे. पेस्टीसाईडस् कंपन्यांवर कडक निर्बंध लावण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी विधान सभेत चिंता करण्याची गरज नसून कायदा करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email