प्रबोधन- समाजपरिवर्तनाच्या वाटा
शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरुन
व्यास क्रिएशन प्रकाशित ‘प्रबोधन- समाजपरिवर्तनाच्या वाटा’ हा दिवाळी अंक विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी संदर्भ ग्रंथ आणि महत्वाचा दस्तावेज ठरला आहे. अंकाचे संपादक श्री. वा. नेर्लेकर असून प्रा.श्याम अत्रे हे अतिथी संपादक आहेत. व्यास क्रिएशनतर्फे दरवर्षी ‘प्रतिभा’ दिवाळी अंक एक संकल्पना घेऊन प्रकाशित केला जातो. यंदाच्या वार्षिकासाठी ‘प्रबोधन सामाजिक परिवर्तनाच्या वाटा’हा विषय घेण्यात आला आहे. अंकाची मांडणी तात्विक आणि व्यावहारिक चर्चा, महाराष्ट्राबाहेरील प्रबोधनकारांचे समाजचिंतन आणि महाराष्ट्रातील प्रबोधनकारांचे समाजचिंतन अशा तीन गटात करण्यात आली आहे.
तात्विक आणि व्यावहारिक चर्चा या विभागात प्रबोधन- प्रेरणा आणि प्रक्रिया (श्याम अत्रे), संतवाड्मयाची फलश्रुती (डॉ. अनुराधा कुलकर्णी) समाप्रबोधन पर्वातील संस्थात्मक कार्य (डॉ. मंगला सिन्नरकर), स्वातंत्र्योत्तर काळातील वैचारिक स्थित्यंतरे (रमेश पतंगे) आणि अन्य अनुषंगिक लेख आहेत.
महाराष्ट्राबाहेरील प्रबोधनकारांचे समाजचिंतन या विभागात राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, नारायण गुरु, स्वामी विवेकानंद, सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी, योगी अरविंद यांच्या सामाजिक योगदानाची माहिती देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील प्रबोधनकारांचे समाजचिंतन या विभागात एकूण २६ व्यक्तिंच्या सामाजिक कार्याचा परिचय करुन देण्यात आला आहे. यात बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, ताराबाई शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, गोपाळ कृष्ण गोखले, गाडगेबाबा, शाहू महाराज, रघुनाथ धोंडो कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. म. माटे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, हमीद दलवाई आणि अन्य समाजसुधारकांचा यांचा समावेश आहे.