प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद

नवी दिल्ली, 5 – प्रधानमंत्री आवास योजनेच्या देशभरातील लाभार्थींशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या लाभार्थींशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही तिसरी वेळ आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधणे हा आनंददायी अनुभव असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. अशा संवादामुळे योजनेचे विविध पैलू समजून घेणे तसेच सुधारणेची आवश्यकता समजून घेणे सोपे होते, असे ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना ही केवळ विटा आणि सिमेंटवर आधारित नये तर दर्जेदार जीवनमान देण्याबरोबरच नागरिकांची स्वप्ने साकार करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारने देशातील प्रत्येकाला घर देण्यासाठी ही मोहीम हाती घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी लाभार्थींशी बोलतांना दिली. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 2022 साली 75 वर्ष पूर्ण होत असून तोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सुमारे 3 कोटी तर शहरी भागात 1 कोटी घरे बांधण्याची सरकारची योजना आहे.  केंद्र सरकारने आतापर्यंत शहरी भागात 47 लाख पेक्षा जास्त घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. आधीच्या सरकारने 10 वर्षांच्या अवधित मंजूर केलेल्या घरांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या चौपट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ग्रामीण भागात केंद्र सरकारने 1 कोटी पेक्षा जास्त घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. आधीच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या 4 वर्षात 25 लाख घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली होती, असे पंतप्रधान म्हणाले. घर बांधण्यासाठी लागणारा अवधी केंद्र सरकारने 18 महिन्यांवरुन 12 महिन्यांपर्यंत आणला आहे, त्यामुळे सहा महिन्यांची बचत झाल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सध्याच्या सरकारने अनेक सकारात्मक बदल केले असून बांधल्या जाणाऱ्या घराचे क्षेत्रफळ 20 चौ.मी.वरुन 25 चौरस मीटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पूर्वी घराच्या बांधकामासाठी 70 ते 75 हजार रुपये इतकी रक्कम दिली जात असे. आता ही रक्कम सव्वा लाख रुपये वाढवण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना नागरिकांचा सन्मान जपणारी असून महिला, दिव्यांग बंधू-भगिनी, अनुसूचित जाती-जमाती, इमाव आणि अल्पसंख्याक समुदायांना हक्काचे घर मिळावे यावर भर दिला जात असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधताना, या योजनेच्या माध्यमातून सर्वांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ही योजना अधिक सक्षम करण्यासाठी आणि घरांचे काम जलद गतीने आणि दर्जेदार व्हावे यासाठी सरकार कौशल्य विकासावर विशेष भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने सुमारे 1 लाख मजुरांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये महिला मजुरांनाही प्रशिक्षण दिले जात असून त्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जात आहे.

स्वत:चे घर असावे हे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल या योजनेच्या लाभार्थींनी पंतप्रधानांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडून आला आणि त्यांचे जीवनमान कसे उंचावले याबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.