प्रजासत्ताकाचा ६८ वा वर्धापन दिन : ठाणे येथे ध्वजारोहण

 

पायाभूत सुविधांच्या विकासाचा फायदा

 जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी जनतेला – पालकमंत्री एकनाथ शिंदे

 (श्रीराम कांदु)

ठाणे दि २६ : ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधींचा फायदा येथील ग्रामीण आणि शहरी जनतेला होणार आहे  मग ते ग्रोथ सेंटर असेल किंवा बिझनेस हब,मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्य सेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी साकेत मैदान येथे मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दलापासून, ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक अशा विविध पथकांचा समावेश होता. याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव,  जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परम वीर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा  लाभ

यावेळी बोलतांना पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील विविध योजना यशस्वीरित्या राबविल्याबध्दल जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी विभाग,पोलीस,आरोग्य यंत्रणा यांचे विशेष अभिनंदन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा  लाभ झाला असून  ५० कोटी १६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

 

सिंचन क्षमता वाढली

जलयुक्त शिवाराच्या या कामांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता सात हजार हेक्टरनं वाढली असून रब्बीच्या दुबार क्षेत्रात सुमारे साडे तीन हजार हेक्टरनं वाढ झाली आहे. जिल्ह्यात ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात आली असून प्रधानमंत्री आवास योजना तसंच, शबरी, रमाई या योजनांतर्गत परवडणारी घरं निर्माण करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असल्याबद्धल त्यांनी अभिनंदन केले.

गतिमान प्रशासनाचे उत्तम उदाहरण

ग्रामविकास आणि महसूल विभागानं शंभर टक्के अर्ज निकाली काढून गतिमान प्रशासनाचं उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलं आहे त्याचेही त्यांनी कौतुक केले.  नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये ३२ वर्क स्टेशन्स कार्यरत करण्यात आली असून ई-फेरफार, ऑनलाइन डाटा अपडेशन या सेवांमुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे असे ते म्हणाले.

पर्यटनाला चालना

ठाणे जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात जागतिक दर्जाचा स्कायवॉक बांधण्यात येणार असून टिटवाळा, श्रीमलंगगड या ठिकाणी देखील पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत असे सांगून पालकमंत्री म्हणाले की,

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत गेल्या वर्षी २६ कोटी तर यंदा ३२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्यात दळणवळण सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून  ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सक्षमीकरण होत आहे. आजपासूनच जिल्ह्यात कुष्ठरोग निवारणाची मोहीम सुरू करीत असून त्यालाही पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्र्यांनी परेडची पाहणी केल्यानंतर शानदार संचालन झाले. ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल, अग्निशमन दल, मुंब्रा, ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, राज्य राखीव दल, पोलीस परिमंडळ १ आणि ५, शहर वाहतूक शाखा, होमगार्ड, राज्य उत्पादन शुल्क, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संचालन केले.

जलमित्र पुरस्कारांचे वाटप

यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते पोलीस पदक मिळाल्याबद्धल पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील तसेच सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, रवींद्र वाडेकर आणि शांताराम अवसरे यांचा गोरवा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांना कोकण विभागात ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामासाठी उउत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार देण्यात आला.

इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे

विभागस्तर जिजाऊ जलमित्र   पुरस्कार :विभागस्तरावर ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच शहापूर तालुका कृषी अधिकारी , जिल्हास्तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार: शहापूर आणि मुरबाड तालुका कृषी अधिकारी , जलमित्र पुरस्कार विजेते : तंत्र अधिकारी रावसाहेब जाधव, कृषी सहायक सचिन तोरवे. याशिवाय मळेगाव( शहापूर), वांद्रे ( शहापूर), काराव( अंबरनाथ), कांदळी ( भिवंडी ), भोरांडे ( मुरबाड) या गावांना देखील सन्मानित करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे हरित हेल्थ केअरचे अतुल भट्ट, गणेश प्लास्टिकचे हरीतच्न्द्र राणे, तेज कंट्रोलचे फिलीप जॉकब यांना देखील जिल्हा उद्योग पुरस्कार देण्यात आला.

शरीरसौष्टव स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता चिन्मय शेजवळ यालाही गौरविण्यात आले.

गिरीराज हाईट्स येथील आग विझविण्यात महत्वाची कामगिरी करणारे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे तसेच श्री धुमाळ यांना देखील पुष्पगुच्छ देण्यात आले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

तत्पूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी देखील ध्वजारोहण झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email