पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी द्या!
(म.विजय)
मुंबई : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या आणि मासिक वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या ज्ञानेश्वर अहिरराव या पोलीस शिपायाने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. अहिरराव यांच्या या मागणीने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अहिरराव हे वांद्रे येथे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा बंदोबस्तावर काम करतात.त्यांच्या पत्नीच्या पायाचा अस्थिभंग झाल्याने २० ते २२ मार्च २०१८ या कालावधीत ते गावी गेले होते. त्याविषयी त्यांनी मरोळ येथील आपल्या कार्यालयात त्याची माहितीही दिली होती.पत्नीच्या आजारपणासाठी तीन दिवस सुट्टीवर गेलेल्या अहिरराव यांचे मासिक वेतन वेळत न आल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी भीक मागण्याची परवानगी त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे मागितली आहे.अहिरराव यांनी घेतलेल्या कर्जापोटी त्यांच्या वेतनातून काही रक्कम कापली जाते. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी, मुलगी असून कर्जाच्या परतफेडीसाठी मासिक वेतन वेळेत मिळणे गरजेचे आहे. परंतु वेतन न मिळाल्याने आपण आर्थिक अडचणीत आल्याचे अहिरराव यांचे म्हणणे आहे.कर्जावरील व्याज आणि दंड असा दुहेरी फटका बसल्याने कुटुंबाचे हाल होत असून यातून मार्ग काढण्यासाठी भीक मागण्याची परवानगी द्यावी, असा सूर त्यांच्या पत्रात उमटला आहे.या पत्रासोबत अहिरराव यांनी पत्नीचे आजारपण आणि उपचाराच्या खर्चाचीही कागदपत्रेही जोडली असून या पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांनाही पाठविली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही प्रशासकीय बाब असल्याचे मत याविषयी व्यक्त केले आहे.