पोलिसांना बुलेट देताय तर दिवेकरांना बैलगाड्या तरी द्या ; दिव्यातील रिक्षाचालकांची मागणी

(राजेश सिन्हा)

दिवा-भाजपा आगासन गाव अध्यक्ष आणि रिक्षाचालक मूर्ती मुंडे यांनी वायरल केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनतेय.दिव्यातील रस्त्यांची दुरावस्था त्यातून रिक्षाचालकांना होणारा त्रास या संदर्भात या पोस्टच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.पोलिसांना बुलेट देताय तर दिवेकरांना बैलगाड्या तरी द्या अशा आशयाची ही पोस्ट सध्या फारच गाजतेय.

 

भाजपा आगासन गाव अध्यक्ष आणि रिक्षाचालक मूर्ती मुंडे यांची वायरल पोस्ट

दिव्यातून महानगर पालिकेला कोट्यावधींचा महसूल मिळत जरी असला तरी त्याबदल्यात दिवेकरांना मिळत फक्त निकृष्ट दर्जाच्या पायवाटा आणि गटर. जी थोडी बहुत काम केली जातात त्यातही मोठा भ्रष्टाचार केला जातोय. कधी मंजूर रस्ता गायब होतोय, कधी मंजूर शौचालय, तर कधी चक्क मंजूर स्मशान गायब होतोय. भ्रष्टाचार करण्यात देखील कुठल प्रमाण ठेवलेल दिसत नाही, जे जे दिसेल ते ते गिळंकृत करण्याचा सपाटा येथे अधीकारी आणि कंत्राटदार या जोड-गोळीने लावला आहे.
खड्यांनी बारमाही भरलेला गणेश नगर-बेडेकर नगरचा रस्ता हा तर भ्रष्टाचार करण्यासाठी मोठं कुरणच आहे असं वाटत. कारण या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी बऱ्याच वेळा खडी पडते पण ती फक्त दाखवण्या पूरतीचं, खड्डे मात्र आजही जैसे थे.
गेली अनेक वर्ष चिखलातून आणि खड्ड्यांमधून चालत काढल्यांनातर मुंब्रादेवी कॉलनी रस्ता मंजूर झाला असला तरी मंजूर होऊन चार-पाच महिने होऊन सुद्धा सुरू असलेले काम कासवाला सुद्धा लाजवेल असेच आहे. लोकांना जाणूनबुजून खड्यातून चालायला लावून लोकसभा निवडणुकीच्या तोंडापर्यंत काम रेटायच हे एकमेव उद्देश येथील सत्ताधाऱ्यांचा आहे हे आता लोकांना सुद्धा कळू लागले आहे.
स्टेशन रोड रुंदीकरणाचं नाटक सुद्धा नेमकं किती अंकाचं आहे हे कळायला मार्ग नाही. मंजूर DP वरून सुरू केलेले रस्ता रुंदीकरण आता अधिकाऱ्यांच्या मर्जी नुसार वेड वाकड वळण घेत पुढे सरकतय. स्टेशन रोडला होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता येथे सुरू असलेले काम खर तर युद्ध पातळीवर सुरू करून संपवायला हवं होतं पण तसं नाही. आज ही आम्ही त्याच वाहतूक कोंडीतून, त्याच खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यातून आमची रिक्षा चालवायची, आचके खात कंबरेच हाड तोडून रिक्षा चालवायची, खड्यात टायर तुटून, डागडुजी करून रिक्षा चालवायची, खाजगी कार चालकाला अथवा चालणाऱ्या माणसांना धक्का लागला तर शिव्या खाऊन आणि मार खाऊन रिक्षा चालवायची, किती दिवस साहेब?
आम्ही ऐकलय आयुक्त साहेब म्हणे पोलिसांना २५ लाखाच्या बुलेट दुचाकी देतायत म्हणून.
बस साहेब! आता त्या जोडीला एक काम करा… आम्हाला सुद्धा बैलगाडी द्या. लय उपकार होतील साहेब.

आपला,
मूर्ती मुंडे
रिक्षाचालक, दिवा
अध्यक्ष, भाजपा आगासन गाव

 

Leave a Reply

Your email address will not be published.