पोलिसांना देखील चांगल्या आरोग्याची गरज – प्रताप दिघावकर
कल्याण – पोलिसांचे शरिर ही सामाजिक संपत्ती असून त्यावर समाजाचा अधिकार आहे. त्यामूळे समाजात पोलिसांबद्दल विश्वास उत्पन्न होण्यासाठी चांगले आरोग्य आवश्यक असल्याचे मत अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी व्यक्त केले.मुंबईतील एम्पॅथी फाऊंडेशन आणि कामोठे येथील एमजीएम कॉलेजच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ अंतर्गत पोलिसांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना दिघावकर यांनी सदर मत व्यक्त केले.
कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ हा देशातील पहिला असा विभाग आहे जो आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अहवाल तयार करतोय. याबद्दल दिघावकर यांनी पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांचे विशेष कौतूक केले. पोलिसांना अनेक खडतर परिस्थितीत काम करावे लागते. ज्याचा परिणाम त्यांच्या शरिरावर होत असतो.
नेमकी हीच बाब लक्षात घेऊन या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पोलिसांबरोबरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात प्रामुख्याने हृदयविकार, मधूमेह, नेत्र तपासणी, कान-नाक-घसा, रक्त आदींची समावेश होता. तज्ञ आणि नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपासणी आणि चाचण्या घेण्यात आल्या.
यासाठी महाराष्ट्र औषध संघटनेमार्फत औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तर संबंधित व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आवश्यक त्या सुविधा तातडीने पुरवल्या जाणार आहेत. तसेच १४५ महिला पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांची पेप्समेअर आणि मॅमोग्राफी चाचण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत.
या वैद्यकीय शिबिरात तब्बल १ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके, अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे (कल्याण), रविंद्र वाडेकर (डोंबिवली) यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी यूपीएससी परिक्षेत यश संपादन करणाऱ्या दिग्विजय गोविंद बोडके यांंचाही अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.