पुढील ५० वर्षे भाजपचीच सत्ता : अमित शहा यांचा विश्वास”

 

पुणे – भाड्याचे तट्टू “चेतक’ घोड्याचा पराभव करू शकत नाहीत. आगामी २०१९ लोकसभेत देखील भाजपची सत्ता येऊन, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. देशातील सर्वपक्षीय राज्यस्तरावरील पराभूत नेते एकत्र आले तरीही फरक पडणार नाही. पुढची पन्नास वर्षे भाजपची सत्ता राहील. सत्तर वर्षात कॉंग्रेसने केलेली घाण साडेचार वर्ष साफ करतोय,” अशी टीका देखील राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी आज पुण्यात केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा संदेश, विचार आणि प्रसार माध्यमांतील पक्षविरोधी खोट्या बातम्यांमागील तथ्य तळागाळात पोचविण्यासाठी संकल्प, संघटन आणि नियोजनबद्ध संवादासह “सायबर योद्धा’ बनून काम करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे “महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेल’च्या स्वयंसेवकांशी संवाद कार्यक्रमात शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर मुक्ता टिळक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, संघटनप्रमुख व्ही. सतीश, भाजप आयटी व सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित मालवीय, खासदार अनिल शिरोळे, पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी पदाधिकारी उपस्थित होते. येथे प्रसिद्धिमाध्यमांना प्रवेश नव्हता.

शहा म्हणाले, “सोशल मीडिया प्रचार यंत्रणा मनोरंजनासाठी नव्हे तर परिणाम घडविण्यासाठी आहे. ती सक्षम करण्यासाठी अधिकृत संशोधनात्मक माहिती, आकडेवारी आवश्‍यक आहे. तुलनात्मक विश्लेषण करून हल्ल्याला प्रतिहल्ला करणे, सतत जागृत राहून वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावरील पक्ष व सरकारविरोधी “व्हायरल’ बातम्यांना योजनाबद्ध प्रत्युत्तर द्यावे लागेल. उत्साह, शिस्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना आकर्षित करणारा मजकूर प्रसारित केला पाहिजे. परंतु केवळ सोशल मीडियावर विसंबून न राहता व्यक्ती, गाव, जिल्हा, शहर ते केंद्रापर्यंत माहिती पोचण्यासाठी घामही गाळावा लागेल. “पंचायत ते पार्लमेंट’पर्यंत भाजपची सत्ता कायम राहण्यासाठी सोशल मीडियाने बूथनिहाय स्मार्टफोन स्वयंसेवक तयार केले पाहिजेत.”

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email