पीककर्ज वाटपाची गती वाढविण्यास बँकांना निर्देश द्या!
मुंबई, दि.२३ – खरीप २०१८ या हंगामासाठी पीककर्ज वाटपाची गती बँकांनी वाढवावी आणि तसे निर्देश केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकांना द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना एक पत्र पाठवून केली आहे.
राज्यातील पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेसंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतू सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. मान्सूनचे आगमन झाले असताना सुद्धा बँकांकडून अतिशय संथ गतीने पीककर्ज वाटप होत आहे. बँकांच्या या प्रतिसादाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, केंद्र सरकारने सुद्धा वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. राज्य सरकारने नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात ऐतिहासिक कर्जमाफीची अंमलबजावणी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी नव्याने कर्जास पात्र ठरले आहेत. पेरणीचा हंगाम सुरू झाला असल्याने त्यांना पीककर्जाची गरज आहे. त्यामुळे बहुसंख्य उद्दिष्ट जून अखेरपर्यंत पूर्ण होण्याच्या दृष्टीने बँकांनी पुढाकार घ्यावा आणि तसे निर्देश आपण त्यांना द्यावेत. आपण हस्तक्षेप केल्यास या प्रक्रियेला निश्चितपणे गती येईल, असेही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.