पिसवलीत नवजात शिशूची गळा चिरून हत्या
( श्रीराम कांदु )
डोंबिवली : नवजात बालकाची गळा चिरून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह प्लस्टिकच्या पिशवीत गुंडाळून मोकळ्या जागेत फेकुन दिल्याची हृदय हेलावणारी घटना कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या पिसवली गावात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पिसवली परिसरातील साईसिद्धी पार्क इमारतीच्या मागील बाजूस बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका प्लास्टिकच्या पिशवीत नवजात पुरूष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आला. सदर धक्कादायक प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर या शिशूचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. ही हत्या कुणी व का केली याचा तपास सुरू केला आहे.