पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२५ – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील ‘फ`प्रभाग कार्यालयाच्या सभापतींचे दालनाबाहेरील छताचे प्लास्टर कोसळल्याने कर्मचार्यामध्ये घबराट निर्माण झाली. सुमारे ४८ वर्षापूर्वी ही इमारत बांधण्यात आली असून प्रशासनाने ‘फ’ आणि ‘ग`कार्यालये हलवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असला तरी अजूनही अंमलबजावणी होत नाही.
मंगळावरी दुपारी दोनच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील ‘फ ‘प्रभाग कार्यालयाचे बाहेर असलेल्या छताचे प्लास्टरचा भाग अचानक कोसळला यामुळे जोरदार आवाज झाला यामुळे पहिल्या मजल्यावरील कर्मचार्यामध्ये घबराट निर्माण झाली. तातडीने कर्मचारी कार्यालयाबाहेर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले आणि सर्वाचा जीव भांड्यात पडला. प्रभाग अधिकारी भारत पवार घटनास्थळी आले व त्यांनी पहाणी केली त्यांना विचारले असता ‘फ’ कार्यालय जवळच असलेल्या पी पी चेंबरर्स इमारतीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून फर्निचर बनवण्यात येत आहे व त्यानंतर कार्यालय हलवण्यात येईल. असेही त्यानी सांगितले.
तळ मजल्यावर ‘ग`प्रभाग कार्यालय असून हे कार्यालय सुनील नगर येथे महिला भवनात हलवण्यात येणार आहे मात्र प्रशासन अतिशय हळू निर्णय घेत असल्याचे कर्मचारी सांगतात. कल्याण डोंबिवली महापालिका अतिधोकादायक इमारती पाडण्याचे आदेश देत असताना आपल्याच कार्यालयाची अवस्था त्याना दिसत नाही का असा सवाल विचारला जात आहे. प्रभाग अधिकारी पवार म्हणाले कार्यालय तातडीने हलवण्यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतला जाईल मात्र फर्निचरची कामे अजून झाले नाही ते पूर्ण झाल्यावर कार्यालय हलवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.