पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरी पुल रुंदीकरणाच्या कामास सुरुवात

वर्षानुवर्षे रखडलेले काम एमएमआरडीएच्या माध्यमातून मार्गी लावण्यात यशस्वी

(श्रीराम कांदु)

 ठाणे – ठाणेकरांना दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या कोपरी रेल्वेपुलाच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन अखेरीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सोमवार, २१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तब्बल २००१ सालापासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे पालकमंत्री झाल्यावर २०१५ साली गती दिली आणि त्यांच्याच विनंतीनुसार एमएमआरडीएने हा प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिल्यामुळे अखेरीस आज या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. तसेच, ऐरोली-काटई भुयारी आणि उन्नत मार्गाचे भूमिपूजनही याप्रसंगी झाले. या मार्गामुळे ठाण्यातून बाहेरच्या शहरांना जाणारी वाहतूक, तसेच मुंब्रा बायपासवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

ठाण्यापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग आठ पदरी असल्यामुळे येथील वाहतूक वेगवान आहे, परंतु मुलुंड टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील रेल्वे पुल केवळ चारपदरीच (२+२) असल्यामुळे गेली अनेक वर्षे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील सर्वच लोकप्रतिनिधी या पुलाच्या रुंदीकरणाची मागणी करत होते. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर या पुलाच्या रुंदीकरणासाठी घेतलेल्या बैठकीत पुलाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने २००१ मध्येच तयार केला होता, असे लक्षात आले. मात्र, त्याला विविध कारणास्तव मंजुरी मिळालेली नव्हती.

२००१ साली अवघ्या ९ कोटींचा असलेला प्रकल्पखर्च २०१५ साली २०० कोटींवर पोहोचला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रकल्प करण्यास हतबलता दर्शवल्यावर एकनाथ शिंदे यांनी बैठकीतून एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त यूपीएस मदान यांच्याशी फोनवर चर्चा करून हा प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याची सूचना केली. श्री. मदान यांनी या सूचनेला तात्काळ होकार दिला. श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांचाही होकार मिळवला आणि अशा प्रकारे हा प्रकल्प मार्गी लागला.

मूळ प्रकल्पात केवळ पुलाचे रुंदीकरण होते; परंतु श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार ज्ञानसाधना कॉलेज ते भास्कर कॉलनी सेवा रस्ता या भुयारी रस्त्याचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तीन हात नाका येथे होणारी अनावश्यक वाहतूक कोंडी टळणार आहे. ३६ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून कोपरी येथील जुन्या २ + २ लेन पुलाऐवजी ४ + ४ लेनचा पुल करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था

पुलाचे काम सुरू असतानाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, तसेच एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोपरी आणि जकात नाका परिसराची वारंवार पाहाणी करून पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली. त्यामुळे ठाण्यातून जाणारी बरीचशी वाहतूक मुलुंड पश्चिम मार्गे वळवता येणे शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.