पथनाट्यातून स्वच्छतेचा लोकजागर
आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन
(श्रीराम कांदु)
ठाणे – ठाणे जिल्ह्यात स्वच्छते बाबत विविध उपक्रम सुरु असताना आता नागरिकांना स्वच्छ आरोग्याचा संदेश देण्यासाठी पथनाट्याचा आधार घेतला जाणार आहे. स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी १ ते १५ एप्रिल दरम्यान स्वच्छ पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मनोरंजनातून स्वच्छतचे प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदे दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस.सोनावणे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या स्वच्छता से सिद्धी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील भिवंडी , मुरबाड , अंबरनाथ , शहापूर, कल्याण आदि पाचही तालुक्यातील तब्बल १ हजार ११३ आशा स्वयंसेवकी पथनाट्यात सहभागी होणार आहेत. यातून वैयक्तिक स्वच्छता , परिसर स्वच्छता , घनकचरा व्यवस्थापन , आदि स्वच्छतेबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
या शिवाय ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जाणार असून या पंधरवड्याचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल ऑफिसर नेमण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट अधिकारी – कर्मचारी यांचा होणार गौरव
या व्यतिरिक्त ५ एप्रिलला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियोजन भवन येथे एका बैठकी दरम्यान जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार , आशा स्वयंसेविका , फ्लोरेन्स्र नाईटिंगेल आदि पुरस्काराने आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना गौरवण्यात येणार आहे.