पंतप्रधान नवी दिल्लीत जागतिक दर्जाच्या परिषद केंद्राची पायाभरणी करणार

नवी दिल्ली, दि.२० – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राची (IICC) पायाभरणी करणार आहेत. देशात औद्योगिक विकासाच्या वाढीसाठी व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन आणि आकर्षित करण्यासाठी बैठका, परिषदा आणि प्रदर्शन भरवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून आयआयसीसी विकसित केले जात आहे. नवी दिल्लीतील द्वारका येथे सेक्टर 25 येथे 221.37 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी अंदाजे 25,703 कोटी रुपये खर्च येणार आहे.

या केंद्रामध्ये पुरवण्यात येणाऱ्या सुविधा या आकार आणि गुवणत्तेमध्ये जागतिक दर्जाच्या असतील. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कार्यक्रम, बैठका, परिषदा, प्रदर्शने आणि ट्रेड शो साठी उत्तम सुविधा असतील. जगातील अव्वल दहामध्ये याचा समावेश होईल तर हे भारतातील सर्वात मोठे इनडोअर प्रदर्शन केंद्र असेल. व्यापार आणि उद्योगाला चालना देण्याबरोबरच यातून पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

आयआयसीसी हे एकात्मिक संकुल असेल ज्यामध्ये प्रदर्शन, सभागृह, परिषद केंद्र (प्लेनरी हॉल, बॉल रुम आणि मिटिंग रुम्स) बहुउद्देशीय परिसर, खुली प्रदर्शन जागा, तारांकित हॉटेल्स (पाच, चार आणि तीन तारांकित), किरकोळ सेवा आणि मोठी कार्यालये यासारख्या व्यावसायिक जागांचा समावेश असेल.

नियोजन आणि सौरचना, वाहतूक, पर्यायी ऊर्जा निर्मिती, ऊर्जा संवर्धन, जल संसाधन व्यवस्थापन, घन कचरा व्यवस्थापन, जमिनीचा प्रभावी वापर, पर्यावरण स्नेही इमारतीची रचना याद्वारे शाश्वत दृष्टीकोन ठेऊन सुविधा निर्माण केल्या जाणार असून त्या किफायतशीर आणि निधीमध्ये बचत करणाऱ्या असतील. याचे बांधकाम हरित बांधकाम तत्व आणि इंडियन ग्रीन बिल्डींग कॉन्सिलच्या मानकानुसार असेल.

एकूण परिसरापैकी 40 टक्क्यांहून अधिक परिसर मोकळी आणि हरीत जागा म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. 10.70 लाख चौरस मीटर एवढ्या बिल्टअप क्षेत्रामध्ये हे परिषद केंद्र उभारण्यात येणार असून यामध्ये 11 हजार व्यक्ती सामावून घेण्याची क्षमता असेल तसेच यामध्ये 5 प्रदर्शन सभागृहे, एक किलोमीटर लांब प्रवेशकक्ष, छत मागे-पुढे घेता येईल असा बहुउद्देशीय परिसर ज्याची क्षमता वीस हजार व्यक्तींना सामावण्याची असेल. याचबरोबर साडे तीन हजार खोल्यांचे तीन,चार,पाच तारांकित हॉटेल्स, कार्यालयीन जागा आणि व्यावसायिक तसेच किरकोळ व्यवसायासाठी जागा असेल.

हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विकसित केला जाईल. पहिला टप्पा डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण केला जाईल. यामध्ये परिषद केंद्र आणि प्रवेश कक्षासह दोन प्रदर्शन सभागृहं आणि संबंधित मदत सेवा यांचा समावेश असेल. दुसरा टप्पा 2024 पर्यंत पूर्ण केला जाईल. यामध्ये तीन प्रदर्शन संकुलं, अरेना, मेट्रो जोडणी, हॉटेल्स, किरकोळ आणि कार्यालय जागांचे बांधकाम यांचा समावेश असेल. या प्रकल्पाच्या संकुलात एक समर्पित भूयारी मेट्रो स्थानक असेल. जे एअरपोर्ट हायस्पीड मेट्रो कॉरिडॉरचे विस्तारित स्थानक असेल आणि याचे बांधकाम दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ करणार आहे.

हा संपूर्ण प्रकल्प दोन विशिष्ट मॉडेल्सच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. प्रदर्शन आणि सभागृह केंद्र यासाठी आयआयसीसी लिमिटेड गुंतवणूक करणार आहे तर हॉटेल्स, किरकोळ व्यावसायिक, कार्यालयीन जागा खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून विकसित केल्या जाणार आहेत. दरवर्षी 100 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम इथे आयोजित होतील अशी अपेक्षा आहे. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या इंडिया इंटरनॅशनल कनव्हेनशन ॲण्ड एक्झीबिशन सेंटर लिमिटेड ही पूर्णपणे सरकारी मालकीची कंपनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. हे केंद्र द्वारका द्रुतगती मार्ग आणि शहरी विस्तारित मार्ग-2 ने जोडलेले असून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 11 किलोमीटर दूर आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email