पंजाब नॅशनल बँकेमागोमाग आता इतर बँकेतलेही घोटाळे बाहेर येवू लागले
पंजाब नॅशनल बँकेमागोमाग आता ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतही घोटाळे झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.सदर दोन्हीही बँकेच्या तक्रारीनुसार सीबीआयने याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.
पंजाब नॅशनल बँकेमागोमाग आता नवी दिल्लीत सीबीआयनं हिरे व्यापऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर हिरे व्यापऱ्यानं बँकेत ३९० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले असून हा घोटाळा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेत झाला आहे. द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेडने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेतून २००७ ते २०१२ या कालावधी दरम्यान ३९०कोटींचे कर्ज घेतले होते. सीबीआयनं या कथित घोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर सीबीआयने सदर कारवाई केली आहे. या बँकेने सीबीआयकडे काही महिन्यापूर्वी तक्रार केली होती.याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये कंपनीचे संचालक सभ्य सेठ, रीता सेठ, कृष्ण कुमार सिंह, रवी सिंह व कंपनी द्वारका दास सेठ एसआयजेड इनकॉर्पोरेशन यांची नावे आहेत.तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्येही एक घोटाळा समोर आला आहे. अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात थकीत कर्जा प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. सिंगला यांच्या आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून ९.५ कोटींचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी सदर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमित सिंगला त्याचे वडिल रोशन लाल व आई सुमित्रा देवी या प्रकरणात आरोपी आहेत. कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप बँक ऑफ महाराष्ट्रने एफआयआरमध्ये केला आहे.