न्यायालयाने लोकनिर्भिडसह विक्रात कर्णिक विरोधात दावा दाखल करून घेतला
(म.विजय)
ठाणे – महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची कथित सीडी प्रकरणाच्या माध्यमातून मानहानी केल्याबद्दल न्यायालयाने आज साप्ताहिक लोकनिर्भिडचे संपादक, प्रकाशक आणि विक्रांत कर्णिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करून घेतला. आज जयस्वाल यांनी न्यायालयामध्ये उपस्थित राहून आपली बाजू मांडल्यानंतर प्रथमदर्शनी या दाव्यामध्ये तथ्य असल्याचे मत व्यक्त करीत जयस्वाल यांच्या मानहानीचा दावा दाखल करून घेवून या तिघांविरूद्ध नोटीस देण्याचे निर्देश दिले. दरम्यान सदर प्रकरणी २८ मार्च ही सुनावनीची पुढील तारीख देण्यात आली आहे
घाटकोपर येथून प्रसिद्ध होणा-या लोकनिर्भिड या साप्ताहिकामधून तथाकथिक समाजसेवक विक्रांत कर्णिक यांच्या सागण्यावरून जयस्वाल यांच्या विरोधात ‘सनदी अधिका-याचे विकृत चाळे’ या शीर्षकाखाली मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करून हे साप्ताहिक राज्यस्तरिय वर्तमानपत्रातून वितरित केले होते. सदरचे वृत्त कोणतीही खातरजमा न करता केवळ विक्रांत कर्णिक यांच्या सांगण्यावरून प्रसिद्ध केली होती.
सदरच्या मानहानीकरक मजकूराबद्दल जयस्वाल यांनी या साप्ताहिकाचे संपादक ज्ञानदेव गणपती सुतार, सुविधा प्रिंटर्स तसेच विक्रांत कर्णिक यांना कायदेशीर नोटीस देणेयात आली होती. तथापि या नोटीसीला उत्तर न देता इंग्रजी वाचता येत नसल्याने मराठीत नोटीस पाठविण्याविषयी सांगितले. त्यानंतरही चुकीचे वृत्त छापल्याबद्दल माफी न मागता पुन्हा जयस्वाल यांच्या विरोधात आयुक्तांच्या व्हायरल सीडीचे धुमशान या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून ते साप्ताहिक राज्यस्तरिय वर्तमान पत्रांमधून वितरित केले होते.
या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी लोकनिर्भिडचे संपादक ज्ञानदेव गणपती सुतार, सुविधा प्रिंटर्स आणि तथाकथित समाजसेवक विक्रांत कर्णिक यांच्या विरोधात कलम ५००, ५०१, ५०२ सोबत भारतीय दंडविधान कलम ३४ अन्वये खाजगी मानहानीचा दावा ठाणे न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार आज जयस्वाल यांनी न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडली.
त्यानुसार न्यायालयाने सदर केसमध्ये तथ्य असल्याचे मत व्यक्त करीत सा. लोकनिर्भिडचे संपादक ज्ञानदेव सुतार, सुविधा प्रिंटर्स व विक्रांत कर्णिक यांच्या विरोधातील दावा दाखल करून घेवून त्या तिघांना नोटीस देण्याचे आदेश दिले.