नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील बालकांना गोवर रुबेला लस देणार मोहीम कर्तव्य भावनेतून राबवा
(श्रीराम कांदु)
ठाणे दि.१३ – राज्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये गोवर रुबेला मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची पूर्व तयारी म्हणून ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या मदतीने नोव्हेंबर महिन्यात ठाणे जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांना इंजेक्शनने लस टोचण्यात येणार आहे.
यावेळी विवेक भीमनवार म्हणाले की, यापूर्वी देखिल पोलिओ, देवी, एचआयव्ही क्षयरोग अशा असाध्य रोगांवर देशात नियंत्रण मिळवणे शक्य झाले. आता राज्य शासनाच्या माध्यमातून गोवर रुबेला ही मोहीम राबवली जाणार असून या आजारावर नियंत्रण मिळवता येणे शक्य होईल मात्र त्यासाठी हा कार्यक्रम केवळ सोपस्कर म्हणून न राबवता कर्तव्य भावनेतून राबवला जावा असे आवाहन उपस्थितांना त्यांनी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, एस.एम. ओ. डॉ. जळगावकर, डॉ. किशोर चव्हाण, राजीव गांधी महाविद्यालयाचे बाळरोगतज्ञ डॉ. कुमावत , महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, सहाय्यक संचालक डॉ. आर. व्ही. कदम, डॉ. खरात, निवासी आरोग्य अधिकारी अशोक कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके, गटशिक्षण अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक, विस्तार अधिकारी ( शिक्षण ) आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.