नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने वाटली साखर
( पूजा उगले )
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष झाल्यानिमित्त भाजपच्या कल्याण जिल्ह्यातर्फे साखर वाटून आनंद व्यक्त केला. आजचा दिवस हा ‘काळा पैसा विरोधी दिन आणि भ्रष्टाचार विरोधी दिन’ म्हणून साजरा करणार असल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानूसार कल्याण शहर सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण परिसरात नागरिकांना साखर वाटप करून पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यात आले.
नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळा पैशाला लगाम घालण्यात भाजप सरकारला यश आल्याचे सांगत लोकांना साखर वाटून भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी झालेल्या आंदोलनात नगरसेवक रमाकांत पाटील, नगरसेविका सुनिता खंडागळे, भाजप ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, रोहन पाटील, संजय दळवी, संजय पाटील, विशाल खंडागळे, सुशिला जडियार, उमेश तळेकर, अनिल चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.