नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या निकालास लागणार विलंब !

नाशिक – येथील विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. मतमोजणीची प्रक्रिया क्लिष्ट असतानाच निवडणूक रिंगणात १६ उमेदवार असल्याने ही प्रक्रिया आणखी क्लिष्ट बनली आहे. यामुळे अंतिम निकाल लागण्यासाठी शुक्रवार उजाडणार आहे.

१५ फेर्‍या झाल्यानंतर उमेदवाराने मतांचा ठरवून दिलेला कोटा जरी पूर्ण केला नाही तरी स्पर्धेत जो शेवटचा उमेदवार टिकेल तो निवडून आल्याचे घोषित केले जाईल. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे पाच जिल्हे आहेत.

४९,७४२ मतदारांनी मतदान केले आहे. एकूण वीस टेबलवर मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी नंदुरबार (१६), धुळे (११२),जळगाव (२१), अहमदनगर (२०) व नाशिक (२५) अशी एकूण ९४ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक टेबलावर शंभरचे सुमारे १०६ किंवा ५९ चे सुमारे ५३ गठ्ठे मोजले जातील.

१६ उमेदवार, एक (नोटा) आणि एक अवैध मते अशा १८ आडव्या रकान्यांचा व २५ किंवा ५० उभ्या रकान्यांचा तक्ता प्रत्येक टेबलवर दिला जाईल. एका टेबलावर २५ चे सुमारे १०६ शीट (तक्ते) किंवा ५० चे सुमारे ५३ तक्ते तयार करावे लागतील. म्हणजे ४९,७४२ मतपत्रिकांचा प्रथम पसंती क्रमांक निश्चित होऊन (नोटा) आणि बाद मतपत्रिका निश्चित होतील.

१६ उमेदवारांना मिळालेल्या प्रथम पसंतीच्या मतांची बेरीज ही वैध मते असतील. यात ४९७४२ मतदान झाले आहे. त्या मतांना दोनने भागून त्या भागाकारात एक मिळवून निवडून येण्याचा कोटा २४,८७१ व त्यात १ मिळवून २४,८७२ मतांचा निश्चित केला जाऊ शकेल.

यात अवैध मतांचा समावेश केलेला नाही. परंतु, यात मते अवैध झाले ती संख्या वजा करून विजयासाठी मतदानाचा कोटा निश्चित केला जाऊ शकेल. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असून, उमेदवारांची संख्या १६ असल्याने ती आणखी क्लिष्ट झालेली आहे. त्यामुळे निकाल रात्री उशिरा किंवा शुक्रवारी जाहीर होईल. त्यामुळे यात बदल करून निकाल लवकर लावण्याचा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा प्रयत्न असेल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email