नव्या 19 एम्समध्ये आयुर्वेद विभाग सुरू करणार-श्रीपाद नाईक
नव्या 19 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये (एम्स) आयुर्वेद विभाग सुरू केले जातील, असे आयुष राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी नमूद केले. श्रम मंत्रालयांतर्गत 100 रुग्णालयांमध्ये आयुर्वेद विभाग स्थापन करण्याचे कार्य सुरू झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच गृह मंत्रालयांतर्गत बीएसएफ आणि इतर निमलष्करी दलांच्या रुग्णालयांमध्येही आयुर्वेद विभाग स्थापन करण्याची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासमवेत तिसऱ्या आयुर्वेद दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा वापर करण्याकरता आयुष मंत्रालय भरीव पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले.
आयुष उपचारांचे इतर उपचार पद्धतींबरोबर समन्वयन करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी जोर दिला. तसेच होतकरू उद्योजकांनी आयुर्वेदामधील व्यावसायिक संधी शोधण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
धन्वंतरी जयंतीच्या मुहुर्तावर आज तिसरा आयुर्वेद दिन साजरा होत आहे. त्याप्रसंगी नीती आयोगाबरोबर आयुष मंत्रालयाने ‘आयुर्वेदावर आधारित व्यवसाय संधी आणि उद्योजकता विकास’ या विषयावर राष्ट्रीय परिषद घेतली. याप्रसंगी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. विजेत्यांना मानचिन्हाबरोबर पाच लाखांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याप्रसंगी आयुष हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (A-HMIS) या सॉफ्टवेअरचे लोकार्पण करण्यात आले.