नवी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन आयुष्यमान भारतमुळे देशातील ५० कोटी जनतेला मोठा दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

(म.विजय)

ठाणे दि.०७ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील ५० कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळणार असून रिलायन्स सारख्या हॉस्पिटल्सने देखील सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या ” मोदी केअर” मध्ये योगदान द्यावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी या हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, अनिल अंबानी, डॉ रामनारायणन, तुषार मोतीवाला त्याचप्रमाणे खासदार राजन विचारे, आमदार आशिष शेलार, संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार आदी उपस्थित होते.

सरकार उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,गेल्या काही वर्षांमध्ये निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. आज आपल्या देशात विशेषतः मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे, लोकांना मग ते श्रीमंत असो वा गरीब चांगली आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा ही आवश्यक बाब असून हेल्थकेअर क्षेत्रात आणखीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे, जेणे करून नोकरीच्या संधी सुद्धा वाढतील.

रिलायन्सच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल वार्ड सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुसज्ज केला आहे की, तेथील रुग्ण देखील तिथले वातावरण पाहून लवकर बरा होईल, या हॉस्पिटलमध्ये सर्वाना समान दर्जाच्या सेवा व उपचार मिळणार आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे असे ते म्हणाले.

रिलायन्सच्या या उपक्रमात राज्यात अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात १९ कॅन्सर वरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहे याबद्धल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. कॅन्सरचे वाढते प्रमाण पहाता याची मोठी आवश्यकता आहे आणि या समूहाची ही मोठी झेप ठरेल असेही ते म्हणाले. उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे अशी माहितीही त्यांनी दिली. 

प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून व शिलापूजन करून उदघाटन करण्यात आले. हॉस्पिटलच्या संचालिका आणि विभागप्रमुख मनीषा बोबडे यांनी सर्वांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना टीना अंबानी यांनी राज्यातील आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सेवेची घडी सुरळीत राहावी म्हणून मुख्यमंत्री करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. हे रुग्णालय केवळ नवी मुंबई किंवा मुंबईतील लोकांसाठी नसून देशातील जनतेसाठी  आहे असे त्या म्हणाल्या. वैद्यकीय सेवा देताना मानवता आणि जीव वाचविणे हे आमच्या समोरचे पहिले उद्दिष्ट्य आहे असे त्या म्हणाल्या.

हॉस्पिटलची वैशिष्टये

• आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज 
• अत्याधुनिक साधनसामुग्री
• संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम
• ३६ स्पेशल विभाग
• १२५ तज्ज्ञ डॉक्टर आणि २२५ बेडस्
• ४ आंतराष्ट्रीय  गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर
• रेडिएशन टेक्नोलॉजिसह अत्याधुनिक सुविधा 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email