नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार,उपमहापौरपदी मंदाकिनी म्हात्रे

( म विजय )
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (गुरूवार) निवडणूक झाली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड झाली. सुतार यांना ६७ तर वास्कर यांना ३८ मते मिळाली. यावेळी भाजपचे सहा नगरसेवक अनुपस्थित होते. अपक्षांसह काँग्रेसची मते राष्ट्रवादीला मिळाली. नवी मुंबई महानगरपालिकेचे १३ वे महापौर म्हणून जयवंत सुतार विराजमान होणार आहेत.
उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मंदाकिनी म्हात्रे यांना ६४ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार द्वारकानाथ भोईर यांना ३८ मते मिळाली. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार वैजयंती भगत यांना अवघे तीन मते मिळाली. सर्वपक्षीयांनी नगरसेवकांना व्हिप जारी केले होते. महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले होते. परंतु भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने विजय चौगुले यांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली होती. काँग्रेसमध्ये उपमहापौर पदावरून मतभेद होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली नाराजी, काँग्रेसच्या दहा नगरसेवकांनी दिलेले पाठिंब्याचे आश्वासन, मित्रपक्ष भाजपची गृहीत धरलेली साथ आणि पाच अपक्ष नगरसेवकांतील दोन नगरसेवकांनी सोबत राहण्याचे दिलेले वचन या बळावर महापौरपद जिंकण्याचे मनसुबे शिवसेनेने आखले होते. ठाण्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी गेले दोन महिने मोर्चेबांधणी केली होती. मात्र भाजपने शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेचे अवसानच गळून पडले.
सुतार हे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ते चारवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून आले आहेत. त्यांनी सभागृह नेते, स्थायी समिती सभापतीपद भूषविले आहे. मंदाकिनी म्हात्रे या प्रथमच महापालिकेवर निवडून आल्या असून माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email