नवीन औद्योगिक धोरण भारताला चौथ्या औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व करायची संधी देईल-सुरेश प्रभू
नवी दिल्ली, दि.१३ – वाणिज्य मंत्रालयाने सर्व मंत्रालये, राज्य सरकारे, उद्योग आणि सर्व संबंधितांच्या सल्ला-मसलतीने आखलेले नवीन औद्योगिक धोरण भारताला ड्रोण, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ब्लॉकचेन यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानानुसार बदल करण्याबाबत सरकारची कटिबद्धता दर्शवते, असे केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. ते काल नवी दिल्लीत चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
चौथ्या औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाबरोबरच भारताला भेडसावणारी आव्हाने आणि संधी याला अनुरुप असे हे धोरण असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे देशाला जागतिक पुरवठा आणि मूल्य साखळी मजबूत होईल, असे ते म्हणाले.
जागतिक आर्थिक मंच चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी महाराष्ट्रात एक केंद्र उभारणार आहे. सॅनफ्रान्सिस्को, अमेरिका, जपान आणि चीनमध्ये देखील अन्य केंद्र आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता, ब्लॉकचेन आणि ड्रोण या केंद्राचे भारतातील पहिले तीन प्रकल्प आहेत. जागतिक आर्थिक मंच या प्रकल्पांसाठी नीती आयोग, व्यापार उद्योजक आणि स्टार्टअपचे सहकार्याने काम करेल.