धोकादायक पत्रीपूल अखेर बंद रेल्वेकडून वाहतूक विभागाला लेखी सूचना
कल्याण दि.१२ – प्रसिद्धी माध्यमांनी झोड उठवल्या नंतर अखेर वाहतुकीसाठी धोकदायक असलेला पत्री पूल वाहतुकीसाठी धोकदायक असल्याचे पत्र रेल्वेने वाहतूक शाखेला धाडत या पुलावरून वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने जुना धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकार्यांसह ,कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त ,ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले आहे मात्र हि वाहतूक नव्या पत्रीपूलावरून वळविण्यात आल्याने आधीच होणार्या वाहतूक कोंडीचा कडेलोट होण्याची शक्यता आहे.
कल्याण शहरात दुर्गाडी पूल आणि पत्री पूल हि दोन ब्रिटीश कालीन पूल असून या पुलाचे आयुर्मान संपल्याचे पत्र ब्रिटीश सरकारने राज्य शासनाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला पाठविले होते मात्र यानंतर सुद्धा या पुलाचा वापर सुरूच आहे. पत्री पूल २०१३ साली एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला. तत्पूर्वी हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि नंतर केडीएमसीच्या ताब्यात होता .२००३ साली या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या पुलाचा सर्व्हे करण्यात आला होता. यानंतर या पुलावरून जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असला तरी आजमितीला या पुलावरून जड वाहनाची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता . मागील वर्षी या पुलाचा सरक्षक कठडा ढासळल्यानंतर एमएसआरडीसी कडून याठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करत या पुलावरून वाहतूक सुरूच ठेवण्यात आली होती. यानंतर यंदा पुन्हा या धोकादायक पुलाकडे रेल्वे आणि शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत माध्यमांनी टीकेची झोड उठवताच हा पूल धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे ने पुन्हा एकदा धाडले आहे. यानंतर आता वाहतूक पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या दिशेने पाउले उचलली आहेत .कल्याण शहरातील रेल्वे लाईन वरील पत्रीपूल हा जुना असल्याने जुन्या पुलावरून जड अवजड वाहनाची वाहतूक हि पुलाच्या सुरक्षित तेच्या दृष्टी=कोनातून बंद करणे आवश्यक असल्याबाबत रेल्वे विभागाकडून कळवण्यात आले आहे कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथूण पत्री पुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गादीच्या दिशेने जाणाऱ्या तसेच दुर्गाडी येथून पत्री पुलावरून सूचक नाका कोल्शेवाडी कल्याण शहरा अंतर्गत जड अवजड वाहनांना ये जा करण्यास पूर्ण वेळ बंदी करण्यात येत आहे या करीता दोन्ही बाजूस हाईट बरीयार्स लावण्यात येत आहे .जड अवजड वाहनाची वाहतूक रात्री 11 ते पहाटे पाच च्या दरम्यान नवीन पत्री पुलावरून सुरु राहील या पुलाचे दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम होईपर्यंत हि वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक वाहतूक विभागाने प्रसिद्धीस दिले आहे. दरम्यान जड वाहतुकीला दिवसा शहरातून बंदी असली तरी प्रत्यक्षात या रस्त्यावरून दिवसा रात्री जड वाहनाची वाहतूक सुरु असून जुन्या पुलावरून वाहनांना प्रवेश बंद करत हि वाहतूक नव्या पुलावरून वळविण्यात आल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार हे निश्चित आहे. पूर्वी एकमार्गी असलेल्या या पुलावर दररोज वाहतूक कोंडी होत असताना आता या कोंडीत भर पडणार असून शहराला मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असून हि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेने नियोजन करण्याची मागणी होत आहे.