धुमस्टाईल लूटपाट सत्र चालूच,शिक्षिकेला फटका,व् अन्य कल्याण डोम्बिवली अपराध वृत्त.
( श्रीराम कांदु )
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत धूम स्टाईल लुटारूंनी धुमाकूळ घातला असून पादचारी नागरिक विशेषतः महिलांचे रस्त्याने चालणेही मुश्किल केले आहे. या वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनि या चोरट्याचे धरपकड सत्र सुरू केले असले तरी या घटना दिवसागणिक वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यातच शनिवारी कल्याण पश्चिम योगिधाम परिसरात धूम स्टाईल चोरट्याने एक शिक्षिकेचे 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. कल्याण पश्चिम योगिधाम अजमेरा हाईट्समध्ये राहणारी शिक्षिका रात्री साडे दहा वाजन्याच्या सुमारास योगिधाम परिसरातून आपल्या मुली आणि पतीसह घराच्या दिशेने जात होत्या .यावेळी अचानक समोरून दुचाकी आली. या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला . या प्रकरणी सदर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
डोंबिवलीत 2.86 लाखांची घरफोडी
डोंबिवली : बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरांनी या घरातील तब्बल 2 लाख 86 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना डोंबिवली पुर्वेकडील खंबळपाडा परिसरातील सर्वोदय स्वरूप इमारतीत घडली. डोंबिवली पूर्वेकडील खंबळपाडा परिसरातील सर्वोदय स्वरूप इमारतीत राहणारे शशिकांत दातार शनिवारी सकाळी भाऊबीजेनिमित्त दाराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरांनी लॅच तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 2 लाख 86 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून पोबारा केला. रात्री 8 वाजता घरी परतलेल्या दातार यांना आपल्या घरातील किमती सामानाची चोरी झाल्याचे समजताच त्यांनी याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
धूमस्टाईलचा महिलेला फटका
डोंबिवली : रेल्वे स्थानकानजीक थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि 70 हजार रुपये असलेली पर्स दुचाकीस्वारांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शनिवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकानजीक घडली. अजित सिंग आपली मेहुणी गीता कौर हिच्या समवेत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन बाहेरील पुना लिंक रोडवर थांबलेले होते. अचानक दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 70 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, तसेच खांद्यावर असलेली सुमारे 70 हजार रूपये असलेली लेदरची पर्स खेचून पोबारा केल्याप्रकरणी सिंग यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
छताची कौले काढून दागिने लंपास
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील आजदेपाडा परिसरात शिवमंदिराच्या बाजूला असलेल्या वसंत पाटील चाळीत राहणारी महिला शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेली होती. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने छताची कौले काढून या महिलेच्या घरात प्रवेश केला. या घरातील 42 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. काही कालावधीने घरात पोहचलेल्या या महिलेला घराची कौले अस्तव्यस्त झालेली आढळून आली. या प्रकरणी सदर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰