धुणे धुण्यासाठी गेलेल्या नणंद-भावजयीचा बुडून मृत्यू
पाटोदा – धुणे धुण्यासाठी गेलेल्या नणंद-भावजयीचा तलावातील डोहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना दुपारी घडली. सायंकाळी उशिरा घटना उघडकीस आली. दगडफोडीच्या कामानिमित्ताने तालुक्यातील आंबेवाडी येथे स्थिरावलेल्या कुऱ्हाडे कुटुंबीयांवर एन सणासुदीच्या दिवसांत काळाची कुऱ्हाड कोसळली. काजल बाळू कुऱ्हाडे (वय १८) व सोनाली कुऱ्हाडे असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पाटोदा तालुक्यातील आंबेवाडी (पिंपळवंडी) येथे दगडफोडीच्या कामानिमित्ताने कुऱ्हाडे कुटूंबिय स्थिरावलेले आहे.
बारा वाजण्याच्या सुमारास दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गावाजवळील तलावातील डोहात गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत, म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता तलावातील पाण्याच्या डबक्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.
त्यानंतर ही माहिती अंमळनेर पोलिसांना देण्यात आली. अंमळनेरचे पोलीस उपनिरीक्षक गडवे यांनी घटनास्थळी भेट दिली.उत्तरीय तपासणी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद करणे सुरू होते.