धर्मादाय रुग्णालयांतील शासकीय योजनांच्या तपासणीसाठी नेमलेल्या समितीचा बोजवारा ; सतीश कोचरेकर

मुंबई- सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा एकप्रकारे गरजू रुग्णांवर अन्याय आहे. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या जाणर्‍या उपचारांची गुणवत्ता, उपचार करतांना येणार्‍या अडचणी, उपचारांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, औषधांचे दर, तसेच योजनेकरता खाटा राखीव ठेवण्यात येतात कि कसे, याची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 28.5.2014 च्या शासन निर्णयाद्वारे डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली. या तज्ञांच्या समितीने त्रैमासिक शिफारस वजा अहवाल धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, तसेच या अहवालाची प्रत शासनास सादर करणे बंधनकारक होते. असे असतांना गेल्या 3 वर्षांत या समितीने एकही बैठक घेतलेली नाही, एकाही रुग्णालयाची तपासणी केलेली नाही, तसेच एकही अहवाल सादर केलेला नाही. अशी निष्क्रीय समिती काय कामाची, असा प्रश्‍न करत ही समिती बरखास्त करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे  सतीश कोचरेकर यांनी  पत्रकार परिषदेत केली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत ही मोहिम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी यांनी सांगितले. या वेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ता डॉ. विजय जंगम (स्वामी), डॉ. उपेंद्र डहाके, हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर हेही उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीने स्वतः पुढाकार घेऊन एप्रिल 2017 आणि डिसेंबर 2017 मध्ये राज्य सहाय्यित धर्मादाय रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि तेथे शासकीय योजनेची प्रसिद्धी होते किंवा कसे, याचा अभ्यास केला. त्या वेळी बर्‍याच रुग्णालयांत शासकीय योजनेची प्रसिद्धी होत नसल्याचे लक्षात आले. या पार्श्‍वभूमीवर या तज्ञ डॉक्टरांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री,  आरोग्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणार आहोत, तसेच याविरोधात आंदोलनही छेडणार असल्याचे  कोचरेकर यांनी सांगितले. शासनाने ही समिती त्वरित बरखास्त करावी, तसेच या समितीत कार्यक्षम अशा तज्ञांची नव्याने नियुक्ती करावी; या समितीच्या कार्याचा आढावा शासनाने वेळोवेळी घ्यावा; या समितीचा कारभार पारदर्शक होण्यासाठी या समितीचा कार्यआढावा, चौकशी अहवाल आणि केलेली कारवाई प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस द्यावी; तसेच सामान्य रुग्णांच्या तक्रारी धर्मादाय रुग्णालयांकडून सोडवल्या जात नसल्यास त्या रुग्णांना या तज्ञांच्या समितीकडे थेट तक्रारी याव्यात, यासाठी व्यवस्था निर्माण करावीत आदी मागण्या हिंदु जनजागृती समितीने केल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email