देसले पाडा येथील मुलाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा अन्यथा उपोषण,आई-वडिलांचा इशारा
पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – घराशेजारी खेळत असताना अचानक बेपत्ता झालेल्या ७ वर्षाच्या चिमुकल्या अथर्व वारंगचा मृतदेह घराशेजारी काम सुरु असलेल्या एका इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत आढळला होता. या अथर्वच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याला ड्रेनेजच्या पाण्यात बुडवून त्याची हत्या करण्यात आल्याचे निदान झाले आहे. पोलीस तपास संथगतीने सुरु असल्याने मृत मुलाचे आई-वडील नाराज झाले आहेत. मुलाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटका करा अन्यथा पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर उपोषणास बसू असा इशारा मृत मुलाच्या आई-वडिलांनी दिला आहे. तर या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीनेहि उपोषणाचा इशारा दिला आहे.
डोंबिवली येथील देसले पाडा येथील गजानन चाळीत राहणाऱ्या आत्माराम वारंग यांचा ७ वर्षाचा दुसरी इयत्तेत शिकणारा अथर्व हा चिमुरडा २४ मे रोजीसकाळी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाला. घराशेजारी काम सुरू असलेल्या एका अनाधिकृत इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीच्या उघडया चेबर जवळ उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला या ड्रेनेज बाहेर आलेला हात दिसल्यानंतर अथर्वचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी पंचनामा करून अथर्वचा मृतदेह कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता मात्र शव विच्छेदनात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याने तसेच त्याला ड्रेनेजच्या पाण्यात बुडवून त्याची हत्या केल्याचे निदान करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलाची आई ज्योस्ना वारंग यांनी पोलीस तपासाबाबत माहिती मिळत नसल्याचे सांगितले. बांधकाम ठिकाणच्या टाकीत माझ्या मुलाचा मृतदेह मिळाल्याने या ठिकाणच्या विकासकावर पोलीसांनी कारवाई करावी. पोलीसांनी लवकरात माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही तर मी माझ्या मुलाच्या फोटो गळ्यात घालून पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले. तर वडील आत्माराम यांनीही पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांनी या प्रकरणी पोलिसांनी तपासाची माहिती द्यावी आणि योग्य दिशेन तपास करावा अन्यथा ७ दिवसानंतर डोंबिवलीत उपोषणास बसू असा इशारा दिला आहे. दरम्यान या हत्येप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.