देशाने पर्यायी इंधन स्रोतांकडे वळण्याची वेळ आली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत

मुंबई, दि.०६ – देशाने पर्यायी इंधन स्रोतांकडे जसे की, इथेनॉल, मेथॉल आणि जैव डिझेल वळण्याची वेळ आली असल्याचे मत केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग, नौवहन, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत “इंडो केम 2018-केमिकल्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स-ॲडव्हान्टेज इंडिया” या 10 व्या द्वैववार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे उद्‌घाटन करतांना बोलत होते. इथेनॉल हे भविष्य असून त्याचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयात कमी करुन निर्यात वाढवण्याची आणि आयात वस्तूंना पर्याय शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

खनिजे आणि मनुष्यबळ या भारताच्या दोन बळकट बाजू आहेत. तंत्रज्ञान, नवीनतम शोध, संशोधन आणि विकास, उद्योजकता यात भारत उत्तम कामगिरी करत आहे. नव्या संशोधनातून भारत जगात बदल घडवून आणू शकतो, असे गडकरी यांनी सांगितले. पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात भरपूर क्षमता असल्याचे सांगतानाच त्यांनी प्रदूषणमुक्तीचे महत्व अधोरेखित केले. पारदर्शकता, गुंतवणूक आणि निर्यातीला प्रोत्साहन यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. ऊर्जा आणि वीज क्षेत्राची गरज लक्षात घेऊन कृषीतील वैविध्याचे महत्व गडकरी यांनी सांगितले. नवी पिके ओळखायला हवी, असे त्यांनी सांगितले. कृषी उत्पादनांचा रसायनांच्या निर्मितीसाठी उपयोग होण्याबाबतच्या शक्यता आजमावण्याचे आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्राला केले. यामुळे देशाचे चित्र पालटू शकेल असे ते म्हणाले.

परिसंस्था आणि पर्यावरण यांचे महत्व गडकरी यांनी आपल्या भाषणात उद्‌धृत केले. इथेनॉलपासून जैव प्लॅस्टिकही तयार होऊ शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी “इंडो केम 2018 नॉलेज पेपर” प्रकाशित करण्यात आला. रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योग 6.2 टक्के वेगाने वृद्धिंगत होत असल्याचे रसायने आणि खत मंत्रालयातील रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागातील सचिव पी. राघवेंद्र राव यांनी सांगितले.

सरकारने उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे रसायन उद्योग प्रगती करत असल्याचे राव यांनी सांगितले.

मुंबईत 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान “इंडो केम-2018” चे आयोजन करण्यात आले आहे. रसायन क्षेत्रात देशामध्ये गुंतवणुकीच्या संधी आणि “मेक इन इंडिया” ला चालना देण्याकरता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगातल्या विविध भागातल्या 300 हून अधिक आघाडीच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स कंपन्यांना यात सहभागी झाल्या आहेत. रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार आणि फिक्की यांनी संयुक्तरित्या “इंडो केम-2018” चे आयोजन केले असून रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातला देशातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email