दिव्यांग विद्यार्थांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
श्रीराम कांदु
समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग संस्था / विद्यार्थाना उपलब्ध होणार बाजारपेठ
ठाणे दि ५ ऑक्टोबर : दिव्यांग संस्था आणि व्यक्तींनी दिवाळी सणाच्या निमित्ताने तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ठाण्यातील गावदेवी मैदानात १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मेळाव्यास भेट देऊन दिव्यांग संस्थाच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या साहित्य निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे आवाहन समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग संस्था दरवर्षी दिवाळी सणाचे औचित्य साधत आकाश कंदील , सुगंधी उटणे , पणती , दिवाळी फराळ आदि वस्तू तयार करून आपापल्या स्तरावर त्याची विक्री करतात. मात्र यंदा समाज कल्याण विभागाने पुढाकार घेत जिल्ह्यातील तब्बल वीस दिव्यांग संस्थाना एकत्रित करून यानिमित्ताने मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या विक्री मेळाव्यात प्रत्येक संस्थेला विक्रीसाठी स्वतंत्र स्टॅाल उपलब्ध करण्यात येणार आहे.
अपंग कल्याण सेस फंडातून २०१७ – १८ वर्षाकरिता ही योजना राबवली जात असून दिव्यांग व्यक्तींना तसेच विद्यार्थाना स्वावलंबी होण्यासाठी आणि त्यांनी अवगत केलेल्या विशेष कलेला व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या साहित्य निर्मितीला योग्य तो मोबदला मिळावा वं त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ व्हावी असा या योजनेचा हेतू आहे. दोन दिवशीय चालणारा हा विक्री मेळावा सकाळी ८ पासून रात्री ९ पर्यंत सुरु राहणार आहे.