दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढणार – उपमुख्य निवडणूक अधिकारी
ठाणे दि.१३ – दिव्यांग मतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणकोणत्याअडचणी येतात, अपंग मतदारांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत व त्यासाठी काय काम करणे आवश्यक आहे यासाठी चर्चा करण्याकरिता ठाणे, मुंबईशहर, मुंबई उपनगर व पालघर या ४ जिल्हयातील दिव्यांगाकरिता कार्यरत असलेल्या स्वंयसेवी व सेवाभावी संस्था यांचा मेळावा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
सध्या सुरु असलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर व पालघर या ४ जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे घरोघरी भेटी देण्याच्या कार्यक्रमामध्ये दिव्यांग पात्र मतदारांचा शोध घेऊन त्यांची मतदार यादीमध्ये नोंद करण्यात येत आहे.
या मेळाव्यास आयुक्त अपंग कल्याण विकास योजना रुचेस जयवंत आणि उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड हे उपस्थित होते. ठाणे जिल्हयातील २० , मुंबई शहर जिल्हयातील १४, मुंबई उपनगर जिल्हयातील १२ असे एकूण ४६ स्वंयसेवी व सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
निवडणूकीच्या वेळी दिव्यांग व्यक्तींना प्रशासनाकडून कोणत्या प्रकारच्या सुविधा आवश्यक आहे याबाबत सदर पदाधिका-यांसोबत साधक – बाधक चर्चा करुन, त्यांना जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करणे कामी प्रशासनाला सहकार्य करणे कामी आवाहन करण्यात आले.