दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तू पाहण्याची ठाणेकरांना संधी
दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तू पाहण्याची ठाणेकरांना संधी
दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचे गावदेवी मैदानात प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन
ठाणे दि १२ ऑक्टोबर : जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्थाच्या विद्यार्थांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ठाण्यातील गावदेवी मैदानात आजपासून विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील , मुख्य लेखा वं वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी वं स्वच्छता ) मानसी बोरकर , प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण) यशवंत मोरे , समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वीस संस्थांचे इथे स्टॉल लावण्यात आले असून या स्टॉलवर नागरिकांना आकर्षक दिवाळी कंदील , दिवे , पणती , तोरण ,मेणबत्ती, उटणे , दिवाळी फराळ , पेपर बँग, हात रुमाल,किचन अॅप्रोन, चॉकलेट्स , ज्वेलरी , किचन नॅपकिन्स, मसाले, गिफ्ट एन्व्हलप, रंगीत फुलांचे बुके वं फुले आणि इतर गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येणार आहेत.
हा विक्री मेळावा शुक्रवार १३ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ८ ते रात्री ९ यावेळेपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी उद्घाटनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमन वार आणि अन्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक संस्थेला भेट देऊन त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आणि वस्तूही खरेदी केल्या.
या मेळाव्यात अस्तित्व मतिमंद मुलांची शाळा ,जव्हेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालय , जागृती पालक संस्था , कमलिनी कर्णबधीर विद्यालय ,किशनचंद चेलाराम स्कूल , क्षितिज मतीमंद मुलांची शाळा , एम.बी. ए. फौंडेशन , ओमकार कर्णबधीर विकास संस्था , पालवी कर्णबधीर विद्यालय , प्रज्ञा-करुणा मुकबधीर विद्यालय ,पॅराप्लेजिक्स फौंडेशन , रोटरी स्कूल ऑफ डेफ, राजहंस फौंडेशन ऑटिस्टिक व्होकेशनल सेंटर, सोसायटी फॉर दि रिदिव्यांग व्यक्तींची कलाकुसर नागरिकांना पाहता येणार आहे. भेट देऊन दिव्यांग रिहॅबिटेशन ऑफ पॅराप्लेजिक्स संवाद कर्णबधीर प्रबोधिनी, स्नेहालय मतिमंद मुलींची शाळा , स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन , विकास मतिमंद विद्यालय, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट आदि संस्था सहभागी झाल्या आहेत.
दिव्यांग व्यक्ती वं संस्थाच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या या साहित्य विक्री मेळाव्याला ठाणेकर नागरिकांनी भेट देऊन , विद्यार्थाचे साहित्य खरेदी करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देऊन दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींचे मनोबल वाढवण्याचे आवाहन समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील यांनी केले आहे.