दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा

(श्रीराम कांदु)

खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका आणि रेल्वेच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

· ऑक्टोबरपासून होणारा कामाला सुरुवात

· ५० कोटींचा प्रकल्प

· अपघात टळणार, लोकलचे वेळापत्रक सुधारणार

ठाणे दि.११ – मंजुरीनंतरही प्रदीर्घ काळ रखडलेल्या दीवा येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महापालिकेने या उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. येथील अपघात थांबवण्यासाठी आणि वाढीव लोकलफेऱ्या सुरू करणे शक्य व्हावे, यासाठी या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासंदर्भात खा. डॉ. शिंदे आग्रही होते. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार असून १५ महिन्यांची मुदत असणार आहे.

दिवा येथील रेल्वे फाटकामुळे उपनगरी रेल्वेच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होतो; तसेच रेल्वे रुळ ओलांडताना अनेक अपघात होऊन प्रवाशांचे नाहक बळीही गेले आहेत. त्यामुळे हे फाटक बंद करण्यासाठी येथे रेल्वे उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला होता. रेल्वे रुळांवरील उड्डाणपुलाच्या भागाचे काम रेल्वे, तर दोन्ही बाजूंकडील कामाचे काम महापालिका करणार असून पुलासाठी अंदाजे ५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

मात्र, निधीची तरतूद करूनही विविध कारणांमुळे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होत नव्हती. तांत्रिक कारणांमुळे वारंवार आराखड्यांमध्ये बदल करावे लागले. या आराखड्यांना मंजुरी मिळण्यास वेळ लागत होता. पश्चिम दिशेला पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग जाणार असल्यामुळे त्या दिशेचे आराखडे बदलावे लागले. तसेच, पूर्व दिशेला हा उड्डाणपुल जिथे उतरेल, तिथे विकास आराखड्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाचाही मुद्दा होता.

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार झाल्यापासून दिवा, खारेगाव आणि ठाकुर्ली या तिन्ही ठिकाणी उड्डाणपुलांच्या कामांना गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ठाकुर्ली येथील उड्डाणपुल अलिकडेच वाहतुकीला खुला देखील झाला असून खारेगाव येथील उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम जवळपास पूर्ण झाले आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामालाही गती मिळाली आहे. दिवा येथील उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यासाठीही खा. डॉ. शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी वारंवार बैठका घेऊन प्रकल्पातील अडचणी दूर केल्या.

त्यामुळे महापालिकेने आता उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशांकडील कामाच्या निविदा काढल्या असून रेल्वेनेही गेल्या आठवड्यात रेल्वेच्या हद्दीतील कामाच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्ष कामासाठी १५ महिन्यांची मुदत असणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email