दिवाळीत सोने महागणार

महिनाभरापूर्वी सोने ३० हजारांवर होते, तेव्हा बाजारात ग्राहकांची खरेदी वाढली होती. मात्र, भाव वाढताच ते कमी होण्याच्या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदी थांबविली. असे असले तरी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी पाहता सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. उलट दसरा, दिवाळीत भाव पुन्हा उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे अवमूल्यन झाल्यास सोन्यात वाढ होते. पण, जुलै आणि ऑगस्ट महिना अपवाद ठरला. त्यावेळी अमेरिकेत सोन्याला मागणी कमी असल्यामुळे रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतरही सोन्यात घसरण होऊन भाव ३० हजारांच्या खाली आले होते. त्यानंतर अमेरिकन बाजारात उलाढाल वाढल्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढले. आता डॉलरचे मूल्य वाढल्यामुळे सोन्याचे भाव निरंतर वाढत आहेत.

यंदाच्या सणासुदीत भारतीय बाजारात ग्राहकांना सोने जास्त भावातच खरेदी करावे लागणार आहे. उन्हाळ्यात लग्नसराईत सोन्याने ३० हजारांचा पल्ला गाठला. त्यानंतर भावात घसरण होऊन १७ ऑगस्ट रोजी सोने ३० हजारांच्या खाली आले. ९ सप्टेंबरला भाव २९ हजार ९०० रुपये होता. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वगळल्यास सातत्याने दरवाढ सुरू आहे. दहा ग्रॅम सोन्यामागे ३१ हजार ६०० रुपये दर असला तरी जीएसटीसह ही किंमत ३२ हजार रुपये होत असल्याची माहिती सराफा व्यापारी राजेश रोकडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. सोन्याच्या दरांमध्ये सुरू असलेली ही वाढ वर्षाच्या शेवटपर्यंत कायम राहणार असून दिवाळीमध्ये सोने महाग होणार आहे. साधारणपणे हिंदूंमध्ये तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. ती उन्हाळ्यापर्यंत राहते. सणासुदीचे दिवस संपल्यानंतर सुरू होणारी लग्नसराई लक्षात घेता सोनेखरेदी शक्य तितक्या लवकर करणे हितावह असल्याचे चित्र आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email