दिवाळीत फटाक्या बरोबरच इतर कारणांमुळे पुणे शहरात आगीच्या ३६ घटना
पुणे – यंदा सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके उडवण्याच्या वेळेवर निर्बंध घातले होते. रात्री आठ ते दहा या वेळेत फटाके उडवण्यास परवानगी दिली होती. तरीही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारत पुण्यात रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात आले. या फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडत होत्या. लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या तीन दिवसात फटाक्यांमुळे पुण्यातील विविध भागातील एकूण १७ आगीच्या घटना घडल्या आहेत. याची माहिती अग्निशमन दलाने दिली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु फटाक्यांमुळे आगीच्या घटना वारंवार घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
हेही वाचा:-अनिल अंबानी साठी देश विकायला काढला का मनसे अध्यक्ष राज ठाकरे
फटाके उडविताना काळजी घ्या तसेच फटाके मोकळ्या मैदानात उडवा असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात येत असते. तरी अनेक नागरिक हे आवाहन धुडकावून लावत असल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आताशबाजी करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनानंतर पुढील तीन दिवस शहरातील विविध भागात आताशबाजी करण्यात आली. या तीन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे शहरातील विविध भागात आगीच्या १७ घटना घडल्या.
दरम्यान यंदा दिवाळीत फटाक्या बरोबरच इतर कारणांमुळे शहरात आगीच्या ३६ घटना घडल्या असल्याचे समोर आले असून त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १६ ठिकाणी तर पाडवा आणि भाऊबीज या दिवशी २० ठिकाणी आग लागली असल्याचे समोर आले.