दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून; वडवणी तालुक्यातील घटना

(म.विजय)

बीड – दारू पिण्यास पैसे का देत नाहीस, या कारणावरून एकाने मित्राला दगडाने मारहाण करत त्याला ओढ्यात फेकून दिले होते. गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान या तरुणाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला वडवणी पोलिसांनी अटक केली. ही घटना परवा संध्याकाळी वडवणीपासून काही अंतरावर असलेल्या कान्हापूरच्या पुलाजवळ घडली.

बाळू प्रभाकर थोरात याने शहादेव कोंडीबा चव्हाण (वय २५, रा. कान्हापूर ता. वडवणी) याला दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र शहादेव याने पैसे देण्यास नकार दिल्याने बाळू थोरात याने त्याला दगडाने मारहाण करून जखमी अवस्थेत कान्हापूर जवळील एका ओढ्यामध्ये फेकून दिले होते. जखमी अवस्थेत असलेल्या शहादेव चव्हाण यास त्याच्या घरच्या लोकांनी उपचारार्थ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती वडवणी पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी बाळु थोरात याला अटक केली.

या प्रकरणी शंकर कोंडीबा चव्हाण (रा. कान्हापूर) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास डीवायएसपी नवटक्के ह्या करत आहेत. शहादेव चव्हाण याच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

या वेळी वडवणी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खाडे यांच्यासह आदी पोलिस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.