दारूड्या पोलिसाने केली ढोलकीपटूला बेदम मारहाण सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.११ – कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे एका मद्यधुंद पोलीसाने आपल्याच इमारतीत राहणाऱ्या एका ढोलकीपटू तरूणाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत सदर तरुणाला दोन टाके पडले असून याबाबतची अदखलपात्र (?) तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या ढोलकीपटूने प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्र देखाव्यात सहभाग घेतला होता.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, महेश दत्तात्रय खैरे हा गौरीपाडा येथील तलावाशेजारील श्री लक्ष्मी सोसायटीतल्या सी विंगमधील चोथ्या मजल्यावर राहतो. तो हॉटेल, ऑर्केस्ट्रामध्ये ढोलकी वादकाचे काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या मित्रासह कामावरून घरी आला. त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रविंद्र दगडू तायडे हा पोलिस कर्मचारी दारूच्या नशेत तर्राट असताना त्याची गाडी काढत होता. त्याला गाडी काढण्यासाठी वाट देण्यासाठी महेश खैरे याने सोबत असलेला रिक्षाचालक मित्र चेतन यास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितली. दोघे रिक्षा बाजूला घेत असताना दारूच्या नशेत असलेल्या रवींद्र तायडे या पोलिसाने त्या दोघांना इकडे कुठे राहता, काय करता, असे प्रश्न विचारीत मारहाण केली. यावर महेश खैरे याने त्या पोलिसाला काका मी वरच्या चौथ्या मजल्यावर राहतो, असे सांगितले. तरीही त्या मद्यधुंद पोलिसाने महेश खैरे आणि त्याचा मित्र चेतन यांना जबर मारहाण केली. तसेच पहिल्या मजल्यावरील झोपेतून उठवून हा आपल्या इमारतीत राहतो का, असे विचारून पुन्हा जबर मारहाण केली. रवींद्र तायडे हा पोलिस यथेच्छ दारू प्यायलेला असल्याने त्याला इमारतीतील रहिवाश्यांनीही महेश खैरे हा आपल्या इमारतीत राहत आल्याचे सांगूनही त्याला समजत नव्हते. या जबर झालेल्या मारहाणीत महेश याच्या उजव्या डोळ्यावरील भुवईमधून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. अशाही स्थितीत महेशने खडकपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑनड्युटी पोलिसांनी तू तक्रार देऊ नकोस, नाहीतर तो पोलीस आहे, पुढे-मागे त्याने काय केले तर मग आमच्याकडे येऊ नकोस, अशी भिती दाखवत त्याची तक्रार लिहून न घेता त्याला रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दवाउपचार करण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली. दरम्यान महेश खैरे याला मारहाण करीत असताना त्याच्या मित्राने मद्यधुंद पोलिसाचा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस खात्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या मद्यधुंद पोलिसावर पोलिस खाते काय कारवाई करते, याकडे तक्रारदार तरूणाचे लक्ष लागले आहे.

याबाबत तक्रारदार महेश खैरे याने सांगितले की, आपण सदर इमारतीला एक वर्षांपासून राहत आहे. ढोलकी वादनाच्या ऑर्डर असल्याने बऱ्याच ठिकाणी आपणास जावे लागते. त्यामुळे आठ-आठ दिवस घरी सुद्धा येत नाही. त्यातच सहा महिन्यांची मुलगी असून पत्नी एकटीच घरी राहात असते. त्या मद्यधुंद पोलिसाकडून आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो. या घटनेत पोलिसांनी पोलिसाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा का दाखल केला, असाही प्रतिप्रश्न त्याने केला.

चौकट – 26 जानेवारीच्या संचलनात महेश खैरेंचा समावेश

महेश खैरे हा उत्कृष्ट ढोलकी वादक असून तो अनेक ऑर्केस्ट्रामध्ये ढोलकी वादनाचे काम करतो. त्याने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिल्ली येथील महाराष्ट्राच्या देखाव्यात सहभाग घेतला होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email