दादा कोंडके यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

दादा कोंडके  नाव घेताच नाक मुरडायची आपल्याकडे फॅशन आहे. अतिसाधारण चेहरा,कंबरेला लटकणारी हाफ-चड्डी आणि किंचित अस्पष्ट आवाजातले द्विअर्थी संवाद याहून वेगळी अशी ओळख लोकांना नसते, आणि त्यांना ती तशीच ठेवायची असते. सर्वसाधारणपणे या लोकांना इतकीही कल्पना नसते, की मल्टी- प्लेक्सच्या बाहेर देखील रसिक जनता असते. जे या लोकांना आज कळत नाही, ते दादांना त्यावेळी कळले होते, आणि त्यांनी या जनतेची नाडी अचूक पकडली होती म्हणूनच सलग नऊ चित्रपटांच्या रौप्य-महोत्सवाने मराठी चित्रपटाची गुढी गिनीज बुकात रोवली. पण हे आजच्या यश चोप्रा, करण जोहरच्या अनुयायांना कळत नाही, हे समाजाचे दुर्भाग्य. त्यात मराठी चित्रपटांबद्दल असणारी अनास्था. हिंदी चित्रपट आवडीने बघणाऱ्या मराठीजनांना हे माहित असतं की रजनीकांत अमिताभचा बाप आहे, आणि उत्तर भारतात रविकिशन शाहरुखला कच्चा खातो, पण मराठी सिनेमाला कधी हिंदी इतका भाव देत नाहीत. राज कपूरचं, गुरुदत्तचं, विजय आनंदचं नाव हे लोक अदबीने घेतात, पण ‘प्रभात’ यांना माहित नसते. दादांच्या बाबतीत हे देखील झालं, शिवाय जाणीवपूर्वक हेटाळणी झाली ती वेगळीच.

दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी ८ ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र’रत्ना’चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे. ही ‘बिरुदावली’ नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली. ‘अपना बाजार’ मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवा-दलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवा दलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली आणि सेवा दलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले.

पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवा-दलातील साथीदारांना पाहवले नाही. ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला आणि शाहीर दादा कोंडके वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारककरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. पेंढारकरांनी दादांना ‘तांबडी माती’ या चित्रपटात पहिला ब्रेक दिला. चित्रपट चालला नाही, पण दादांवर चित्रित झालेल्या एकमेव गाण्यात (‘डौल मोराच्या मानंचा’ – जे अजूनसुद्धा हिट आहे) दादांनी बाजी मारली. आणि दादांनी स्वतः चित्रपट निर्मितीत उतरायचे ठरवले. ‘कामाक्षी पिक्चर्स’ने इंडस्ट्रीत पाऊल टाकले. लालबागमध्ये बालपण घालवलेल्या आणि नंतर सेवादलातून गावोगाव फिरलेल्या दादांना एव्हाना सर्वसामान्य जनतेला काय आवडतं, याची चांगलीच कल्पना आली होती. ‘विच्छा’ मधील द्विअर्थी संवादांतून प्रेरणा घेऊन दादा मैदानात उतरले असले, तरी पहिला चित्रपट ‘सोंगाड्या’ मात्र अगदी निरागस होता.

जून १९७१, ‘सोंगाड्या’ प्रदर्शित झाला. सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी सोंगाड्याला सिनेमागृहाची सोय करून दिली आणि सोंगाड्या तुफान गाजला. इतका की बऱ्याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा ‘तेरे मेरे सपने’ उतरवला आणि सोंगाड्या लावला. महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला. खुद्द दादा कोंडके मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेच पुढल्या चित्रपटाची घोषणा केली आणि बॉलिवूडचे धाबे दणाणले. ७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणली. दादा १९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात पुन्हा पडद्यावर आले आणि सुरु झाली दादा विरुद्ध सेन्सॉर बोर्ड अशी खुली जंग. अर्थातच आता मागे वळून पाहताना दादा त्यांना किती भारी पडले, ते दिसतंच.

ठराविक टीम हे कामाक्षी पिक्चर्सचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अभिनेत्री उषा चव्हाण, पटकथा लेखक राजेश मुजुमदार, संगीतकार द्वयी राम-लक्ष्मण, पहिले जयवंत कुलकर्णी मग महेंद्र कपूर मुख्य गायक आणि उषा मंगेशकर मुख्य गायिका. दादांच्या सतत यशामागील सुसूत्रता यातून स्पष्ट होते. दादांच्या गाण्यांबद्दल वेगळा एक लेख, कदाचित एखादी लेखमालिका होऊ शकेल. पण त्यांच्या गाण्यांचे समीक्षण करण्याची माझी लायकी नाही. कुणाचीच नाही.

पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार box office वर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.

तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे आणि ‘तेरे मेरे बीच में’ हे सिनेमे प्रदर्शित झाले आणि आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमानंतर दादांनी थेट गिनीज बुकात एन्ट्री मारली. आल्फ्रेड हिचकॉकचा सलग आठ चित्रपट रौप्य-महोत्सवी असण्याचा रेकॉर्ड तुटला आणि तिथे वर्णी लागली दादा कोंडके यांची. इतकं होऊनही दादा कोंडकेंना पांढरपेशा समाजाने कधी स्वीकारले नाही. इंग्रजी सिनेमांतील उत्तांग प्रणयदृश्ये शौकीने पाहणाऱ्या पांढरपेशा समाजासाठी, स्त्री-पुरुष यांच्या नैसर्गिक संबंधांतले गांभीर्य विनोदातून साकारणारे दादा कायम अश्लीलच राहिले. दादांनीही या वर्गाला मग दुर्लक्षित केले. दादा म्हणायचे की मी किती जरी उत्तम सिनेमा बनवला, तरी उच्चवर्गीय तो फक्त एकदा बघणार, बरी-वाईट प्रतिक्रिया देणार आणि विसरून जाणार. त्यापेक्षा मी असे सिनेमे का बनवू नये की जे एखाद्या श्रमिकाने चार वेळा पाहावेत आणि आपला रोजचा ताप-ताण विसरून मनसोक्त हसावे. दादांचा सिनेमा ‘मास’साठी होता, एखाद्या विशिष्ट ‘क्लास’साठी नव्हे.

याच दरम्यान दादा बाळासाहेबांच्या आणि पर्यायाने शिवसेनेच्या खूप जवळ आले होते. शिवसेनेच्या प्रचारसभेत त्यांनी केलेली भाषणे युट्युबवर आजही ऐकताना हसून हसून डोळ्यात पाणी येते. शिवसेनेने दादांच्या प्रभावाने बरीच माणसे खेचली.

दादा सर्वसामान्यांत सर्वसामान्य बनून राहिले. मुंबईत अथवा बाहेर कुठेही त्यांच्या वावरण्यात कधी गर्व प्रकटला नाही. “जर मी एखाद्या स्टारसारखा वागू लागलो, तर मला आरशात स्वतः कडे पहायची लाज वाटेल. मी सामान्य माणूस म्हणून जन्माला आलो, सामान्य म्हणूनच जगणार”, अशा शब्दांत दादा त्यांचे मत मांडायचे. दादांना रेडिओवरील एका कार्यक्रमात विचारणा केली गेली होती की दादा टीव्ही वर कधी येणार म्हणून. दादांचे उत्तर होते, जेव्हा अमिताभ बच्चन येईल त्यानंतर. पूर्ण इंडस्ट्रीने आणि खुद्द अमिताभने त्यांची यावरून खिल्ली उडवली. आज वास्तव हे आहे की दादा कधीच आले नाहीत, पण अमिताभ आला. आणि ते देखील हात मागे बांधून आला. आज जर दादा कोंडके हयात असते, तर आजच्या सिनेमांत-टीव्हीवर चाललेला नंगा-नाच पाहून त्यांनी जनतेला खुल्ला विचारलं असतं की “तुमच्या मायला, तुमची ‘अश्लील’ची नेमकी व्याख्या तरी काय आहे?”

१४ मार्च १९९८ रोजी, वयाच्या अडूसष्टव्या वर्षी दादांचे हृदय-विकाराने निधन झाले. आयुष्याच्या अखेरीस दादा खूप एकटे पडले होते. त्यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात, “देवा, पुढल्या जन्मात मला पैसा नको, प्रसिद्धी नको, ऐषाराम नको. फक्त माझी म्हणता येतील अशी चार माणसे दे.” आपल्याला इतके भरभरून देणाऱ्या या कलावंतास आज त्याच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली! आणि अपेक्षा करू, जो मान त्यांना हयातीत मिळावयास हवा होता, तो निदान मरणोत्तर तरी मिळावा. निदान स्वर्गात तरी दादांना शांतता मिळावी, हेटाळणी नव्हे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email