‘त्या’ मुलीनेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
नवी मुंबई – सानपाडा अपहरण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपले अपहरण झाल्याचा बनाव स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड झाले आहे. रात्री उशिरा तिनं याची कबुली पोलिसांना दिली. कौटुंबिक वादातून दबाव तयार करण्यासाठी तिने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. सानपाडा येथून १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी संध्याकाळी सानपाडा पोलिसठाण्यात दाखल झाली होती.
ओमनी कारमधून आलेल्या व्यक्तींनी तिला पळवून नेल्याचे लहान भावाने घरच्यांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तातडीनं तपास करण्यास सुरुवात केली. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी पामबिच मार्गावर रस्तारोको करुन पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली होती.
याचदरम्यान सदर अल्पवयीन मुलगी घटनास्थळापासून काही अंतरावरील मेडिकलमध्ये आढळून आली होती. चौकशीदरम्यान, अपहरणकर्त्यांनी वाशीमध्ये फेकल्याचं तिनं पोलिसांना सांगितले. यानुसार तिची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर, अपहरणाचा बनाव स्वतः रचल्याचं तिनं सांगितले.
का रचला अपहरणाचा बनवा?
राजस्थानमधील एका मुलासोबतची तिची मैत्री कुटुंबीयांना खटकत होती. त्याच्या सोबत मैत्री करू नको, असे कुटुंबीयांनी बजावल्याने तिने स्वताच्या अपहरणाचा बनाव रचला. यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे लहान भावाने कुटुंबीयांना अपहरणाची खोटी माहिती दिली. परंतु दोन तास सानपाडा रेल्वे स्थानकात बसून राहिल्यानंतर ओळखीच्या मेडिकल स्टोरमध्ये येऊन थांबली होती. या कथित अपहरण नाट्यामुळे शनिवारी पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली होती.