तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत श्रीमलंगगड परिसराचा विकास करणार, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

गडावरील पायऱ्या, ऑस्ट्रेलियन पद्धतीची टाकी आणि साकवचे झाले उद्घाटन

तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटींचा आराखडा

नळपाणी पुरवठा योजनेसाठीकेंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची खा. डॉ. शिंदे यांची माहिती

श्रीराम कांदु 

ठाणे : श्रीमलंगगड आणि परिसराचा राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून खा. डॉ. श्रीकांत शिंदे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. एकूण २५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत असून मुख्यमंत्र्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अंबरनाथ येथे दिली. श्रीमलंगगड पट्ट्यातील गावांच्या सर्वंकष विकासासाठी अनेक पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीमलंगगड यात्रेचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार विकास निधीतून भाविकांना श्रीमलंगगडावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्यांचे लोकार्पणमंगळवारी पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच, खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नातून श्रीमलंगगड पायथ्याशी नाबार्डअंतर्गत बांधण्यात आलेला साकव (पूल) आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली ऑस्ट्रेलिअन तंत्रज्ञान पद्धतीच्या पाण्याच्या टाकीचेही उदघाटन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार डॉ.बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, सहसंपर्क प्रमुख विजय जोशी,तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

श्रीमलंगगडाच्या यात्रेसाठी लाखो भाविकदर्शनासाठी येतात. इतर दिवशीही राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देत असतात. या पायऱ्यांमुळे लाखो भक्तांना गडावर येणे जाणे सोयीचे ठरणार आहे. तसेच,पायथ्याप्रमाणेच गडावर बांधण्यात आलेल्याऑस्ट्रेलिअन पद्धतीच्या टाकीमुळे गडावरील गावकरी आणि भाविकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. श्रीमलंगगड पट्ट्यातील गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खा. डॉ. शिंदे यांनी दिली.

खासदार डॉ. शिंदे यांनी खासदार निधी आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून श्रीमलंगगड क्षेत्रामध्ये, रस्ते, पाणी, शाळा दुरुस्ती, शौचालये, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी विकास कामांसाठी सुमारे २० ते २२ कोटी रुपायांपर्यंतची कामे मंजूर करण्यात यश मिळवले आहे. यातील जवळपास ६० ते ७० टक्के कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चिंचवली करवले ते नाऱ्हेण ते राज्य राखीव पोलीस दल गेटपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून खरड ते श्रीमलंगगडपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित श्रीमलंगगड मुख्य रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असेपालकमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.